कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याच्या शंका दूर झाल्या आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी मुकाबला होणार आहे.

आज कोल्हापुरात आल्यानंतर मंडलिक यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंडलिक म्हणाले, ही निवडणूक मला फारशी अवघड वाटत नाही. चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक बडे नेते माझ्या पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांनी अनेकदा भेटून सोबत राहण्याची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे निवडणुकीत फारशी अडचण जाणवत नाही.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आमचं ठरले असे घोषवाक्य घेऊन प्रचाराला दिशा दिली होती. आता ते सोबत नाहीत याकडे लक्ष वेधले असता मंडलिक म्हणाले, कोणत्याही लोकप्रिय घोषणेने निवडणूक जिंकता येत नाही. देशात जय जवान जय किसान यापासून अनेक घोषणा झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात काम किती केले याला महत्त्व असते. त्यामुळे काम करणारा खासदार म्हणून लोक माझ्या पाठीशी राहतील.

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

शाहू महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. याबाबत विचारणा केली असता मंडलिक म्हणाले, मुळातच शाहू महाराज यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा किती होती असा प्रश्न आहे. त्यांची एक मुलाखत पाहिली. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कोणत्यातरी नेत्यांनी त्यांना उभे केले आहे असे जाणवले. उमेदवारी अर्ज भरण्यास अजून कालावधी आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला दिशा मिळेल. आणि ती माझ्या बाजूने असेल.

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

ठाकरे सेनेचे बरेच नेते हे शब्दप्रभू आहेत. त्यामुळे ते गद्दार, बेकायदेशीर सरकार अशी टीका करत असतात. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पकाळात विकास कामांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे हे सरकार गद्दार नव्हे तर खुद्दार आहे. आणि ते कसे आहे या निवडणुकीच्या निकालाने दिसून येईलच, असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला.