कोल्हापूर : इचलकरंजी येथे भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत लचके तोडत एका घोड्याचा बळी घेतला. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या धर्तीवर पांजरपोळची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी माणूसकी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरात रस्त्यावरुन फिरणार्‍या एका घोड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याचे लचके तोडले होते. निरामय हॉस्पिटल परिसरात घडलेल्या या हल्ल्यात घोडा गंभीर जखमी झाला होता. नागरिकांकडून या घटनेची माहिती समजल्यानंतर माणूसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात लचके तोडल्याने घोडा गंभीर जखमी होता. माणूसकी फाउंडेशनच्या वतीने त्या जखमी घोड्यावर उपचार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु गंभीर स्वरुपाच्या जखमांमुळे उपचार सुरु असताना घोड्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – कोल्हापूरला पावसाने झोडपले; झाड मोटारीवर कोसळले

हेही वाचा – कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील जखमी; उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा

शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून जनावरांसह थेट माणसांवर, बालकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील प्रत्येक भागात वाढत चाललेल्या चिकनचे गाडे आणि चिकन व मटण विक्रेत्यांकडून ओढ्याकाठी किंवा गटारीत टाकल्या जात असलेल्या तुकड्यांवर गुजराण असणार्‍या भटक्या कुत्र्यांना खाण्यास न मिळाल्यास ते थेट समोर येईल त्याच्यावर हल्ले करत आहेत. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कार्यवाही काहीच दिसून येत नाही. म्हणून ज्याप्रमाणे कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने पांजरपोळ निर्माण करुन त्याठिकाणी भटक्या जनावरांना ठेवले जाते. त्याच धर्तीवर इचलकरंजी शहरातही महानगरपालिकेच्या वतीने पांजरपोळसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी माणूसकी फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली असल्याची माहिती रवी जावळे यांनी दिली.