कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा. त्यासाठी, कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट्ट करा. लोकांची मनस्थिती तयार करा. मनामध्ये कोणतीही शंका- कुशंका राखू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये शिवसेना,-शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजपासह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत होय. विद्यार्थी, नवमतदार, व्यापारी यांच्या मतदानाबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु; बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचेच, ही शपथ घ्या.

प्रास्ताविकपर भाषणात उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेले देशातील काम. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले काम. ही आमच्याकडे सांगण्यासारखी बाजू आहे. हे कामच जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी बाजूकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे जनता निश्चित मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून देईल.

आणखी वाचा-कोल्हापुरात शिवसेनेने प्रचार थांबवला, संदेशाने खळबळ; जिल्हाप्रमुखांकडून इंकार

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया. कामाची पोहोचपावती मोठ्या मताधिक्यातून निश्चितच मिळेल.

गैरसमज नसावा

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक हे दिल्लीला गेल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकले नाहीत. माजी आमदार अमल महाडिक हे सत्यजित कदम यांच्या घरातील विवाह सोहळ्यात आहेत. चंदगडचे भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील हे मुंबईत असल्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

अहोरात्र राबू

भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, कालचा विषय वेगळा होता. जे बोललो ते रोखठोक बोललो. परंतु; मनात काहीही नाही. भाजपच्या दहा हजाराहून अधिक पदाधिकाऱ्यांसह अहोरात्र काम करू, एक दिवसही विश्रांती घेणार नाही.

आमच्याकडे कृष्ण अर्जुन

आमदार राजेश पाटील म्हणाले, या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ कृष्णाच्या भूमिकेत आहेत तर खासदार धनंजय महाडिक हे अर्जुनाच्या भूमिकेत आहेत. विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्याची उत्सुकता आहे.

आणखी वाचा-हातकणंगलेत मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल; ‘मातोश्री’चा स्पष्ट निर्णय

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खासदारकीच्या दहा निवडणुकांचा अनुभव पाठीशी आहे. तगड्या संघटनाच्या जोरावर ही निवडणूकही जिंकू. तर माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सर्वच मित्रपक्षांनी समन्वयाने काम करूया. द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडू. भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेले अफाट काम घेऊन मतदारांपर्यंत जाऊया. विरोधी बाजूला आरोप प्रत्यारोपाची संधी न देण्यासाठी त्यांच्यावर टीका न करण्याचे धोरण घेऊया. श्री. मोदींचे “चारशे पार” चे उद्दिष्ट या निवडणुकीत निश्चितच यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.

जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील म्हणाले, सर्वच मित्र पक्षांमध्ये एकोपा कायम ठेवून मताधिक्य जास्तीत- जास्त घेण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करूया. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, विजय निश्चित आहे. फक्त सूक्ष्म नियोजनाने संघटित काम करूया. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणाने पार पाडूया.

आणखी वाचा-हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी इच्छूकांची ‘मातोश्री’वर धाव

भाजपाचे शहराध्यक्ष विजय जाधव म्हणाले, ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अन्य अशी आहे. हातात हात घालून काम करूया आणि श्री. मोदींचे काम घराघरात पोहोचवूया. शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, समन्वयाने संघटितपणे विजयी पताका खेचून आणूया आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, मजबूत मोट बांधूया आणि निकालाच्या मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सचोटीने राबवूया.

व्यासपीठावर माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, राहुल चिकोडे, उदयसिंह पाटील- कौलवकर, युवराज पाटील, पी. जी. शिंदे, प्रताप उर्फ भैया माने, ॲड. नीता मगदूम, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, सतीश पाटील, कृष्णा चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. आभार नाथाजी पाटील यांनी मानले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders of mahayuti gathered in kolhapur determination of sanjay mandaliks victory mrj