कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधी मैदान प्रभाग समिती सभापती निवडीवेळी ४ पैकी दोन वेळा समान मते पडण्याचा प्रकार घडल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवड करण्यात आली. गांधी मदान प्रभाग सभापतिपदासाठी प्रतीक्षा धीरज पाटील, शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, राजारामपुरी प्रभाग समिती सभापती छाया उमेश पोवार व ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके यांची निवड बुधवारी महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आयोजित विशेष बैठकीत करण्यात आली. जिल्हाधिकारी अमित सैनी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
गांधी मैदान प्रभाग सभापतिपदासाठी नगरसेविका प्रतीक्षा पाटील व नगरसेवक संतोष गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले होते. सभापतिपदासाठी दोन उमेदवार राहिल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये पाटील यांना १३ मते तर गायकवाड यांना ६ मते पडली. या निवडीवेळी नगरसेविका शोभा बोंद्रे व ललिता बारामते गरहजर होत्या.
शिवाजी मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी पिरजादे व नगरसेवक नियाज खान यांचे अर्ज दाखल झाले होते. खान यांनी अर्ज मागे घेतल्याने पिरजादे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे  घोषित केले.
बागल मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी नगरसेविका छाया पोवार, भाग्यश्री शेटके व नगरसेवक राहुल चव्हाण यांचे अर्ज दाखल झाले होते.  शेटके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मतदान घेण्यात आले असता पोवार यांना ९ मते तर राहुल चव्हाण यांना ९ मते पडली. दोघांना समान मते पडल्यामुळे सभा अध्यक्षांनी चिठ्ठी पध्दतीने सभापती निवड करण्यात आली.  पोवार यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापतिपदी निवड झाल्याचे घोषित केले. या निवडीवेळी नगरसेविका. पूजा नाईकनवरे गरहजर होत्या. चिठ्ठी महापालिकेच्या शाहू विद्यालयातील विद्यार्थी आदित्य कोगीलकर याने काढली.
ताराराणी मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी माधुरी लाड व राजसिंह शेळके यांचे अर्ज दाखल झाले होते. मतदान घेण्यात आले. यामध्ये लाड व शेळके यांना समान मते पडल्यामुळे सभा अध्यक्षांनी चिठ्ठी पध्दतीने सभापती निवड करण्यात आली. शेळके यांची चिठ्ठी विद्यार्थी अमित कोगीलकर याने काढली.