भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा मुलगा अशोक कुमार याने, ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार न मिळण्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि इतर मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मात्र गेल्या काही वर्षांपासून ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा या मागणीकडे यंदाही केंद्र सरकारने दुर्लक्षच केलं आहे. त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप, दोन्ही सरकारांनी आपल्या वडिलांच्या कामगिरीची दखल घेतलीच नसल्याची हताश प्रतिक्रीया अशोक कुमार यांनी बोलून दाखवली, ते पीटीआयशी बोलत होते.

2013 साली तत्कालीन युपीए सरकारने सचिन तेंडुलकर याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं. यावेळपासून हॉकीमध्ये भारताचं नाव मोठं केलेल्या ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा या मागणीने जोर धरला होता. “संपूर्ण जगभरात माझ्या वडिलांनी भारतीय हॉकीसाठी जी कामगिरी केली त्याची चर्चा होते. भारतासोबत इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशातली त्यांचे पुतळे बांधले आहेत. पण भारतातलं सरकार मग ते काँग्रेसचं असो किंवा भाजप, माझ्या वडिलांनी केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात अपयशी ठरलं आहे.” अशोक कुमार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. अशोक कुमार हे 1972 साली झालेल्या म्युनिच ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.

होय, साहजिकचं आम्ही निराश झालो आहोत. आमच्यासोबत देशातील लाखो क्रीडाप्रेमींची ध्यानचंद यांना पुरस्कार दिला जावा हीच मागणी होती. सरकारने भारतरत्न पुरस्काराचं राजकारण न करता त्याचं महत्व समजायला हवं, अशोक कुमार बोलत होते. याआधी अजय माकन, जितेंद्र सिंह आणि विजय गोयल या मंत्र्यांनी ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा यासाठी शिफारस केली होती, मात्र त्यावर निर्णय घेतलाच गेला नाही.