गेली १६-१७ वर्षे मॅरेथॉनपटू म्हणून ठसा उमटवल्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे माझी कारकीर्द धोक्यात आली होती. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही मला यापुढे न धावण्याचा सल्ला दिला होता. पण हार न मानता, स्वत:ला सावरत मी या दुखापतीतून बाहेर आले आणि अडीच महिन्यांच्या मेहनतीनंतर मुंबई मॅरेथॉनच्या अर्धमॅरेथॉनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मजल मारू शकले, याचा आनंद होत आहे, ही प्रतिक्रिया आहे नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरेची.

‘‘२०१७मध्ये लंडनमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि दिल्लीत दोन वेळा पूर्ण मॅरेथॉन आणि त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झाल्याने माझ्या गुडघ्याच्या वाटीखालील गादीचा भाग घासला होता. पूर्ण मॅरेथॉनच्या मानाने माझे वजन बरेच कमी असल्याने पायावर ताण येतो. पुन्हा धावण्याचा प्रयत्न केला असता, दुखापत आणखीनच वाढत गेली. मॅरेथॉनपटूंच्या वाटय़ाला येणारे दुखणे माझ्याही वाटय़ाला आल्यानंतर असंख्य मॅरेथॉन शर्यतींचा अनुभव गाठीशी असतानाही मला खेळ थांबवावा लागणार होता,’’ हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील निराशा लपत नव्हती.

‘‘शस्त्रक्रियेनंतरही ही दुखापत बरी होणार नसल्याने मला अनेक नामांकित खेळाडूंनी तसेच डॉक्टरांनी यापुढे मॅरेथॉन थांबवण्याचा किंवा खेळ बदलण्याचा सल्ला दिला होता. मानसिक खच्चीकरण झाल्यानंतरही मी हार मानली नव्हती. त्यामुळे स्वत:च्या जिद्दीवरच मी पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. आठ-दहा महिने दुखापतीवर उपचार केल्यानंतर मी गेल्या अडीच महिन्यांपासून धावायला सुरुवात केली. धावणे, पोहणे, आहारावर लक्ष केंद्रित करून डॉक्टरांच्या मनाईनंतरही मी धावण्याचा निर्धार केला. आता कमी सरावानंतरही पहिल्या तीन जणींमध्ये स्थान मिळवल्याने आनंद होत आहे,’’ असे मोनिकाने सांगितले.

‘‘सध्या दर महिन्याला मी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहे. पुन्हापुन्हा उद्भवणाऱ्या दुखापतींमुळे एका क्षणी थांबण्याचा विचार केला होता. पण मित्र-मैत्रिणींच्या पाठिंब्यामुळे स्वत:ला सावरत मी माघार न घेण्याचा निर्णय घेतला. कारकीर्दीत अखेरच्या टप्प्यावर मला घरच्यांनीही चांगली साथ दिली. आता कांस्यपदक मिळवल्यानंतर एप्रिलमध्ये होणाऱ्या फेडरेशन चषक स्पर्धेवर आणि त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचे मी ठरवले आहे,’’ असे मोनिका म्हणाली.