लॉकडाउनमुळे परराज्यातून आलेले मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी धडपड करत आहेत. सरकारकडूनही त्यांच्यासाठी काही विशेष गाड्यांची सोय करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारसोबतच अभिनेता सोनू सूददेखील या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोनूने अनेक मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विशेष बसची व्यवस्था केली असून अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाचीही सोय केली आहे. याशिवाय या मदतकार्यासाठी त्याने त्याच्या मालकीची संपूर्ण हॉटेल्सही मजुरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

सोनूचे मदतकार्य पाहून सामान्य जनतेसोबतच कला, सांस्कृतिक आणि क्रीडा विश्वातील सेलिब्रिटींनी त्याचे कौतुक केले. भारताचा डावखुरा सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवन यानेही सोनु सूदला ट्विटच्या माध्यमातून सलाम केला. “विविध ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी आणि घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणाऱ्या सोनू सुदच्या प्रयत्नांना आणि मदतकार्याला सलाम!”, असे ट्विट धवनने केले.

त्यावर सोनु सूदने दिलेल्या रिप्लायने त्याने चाहत्यांची मनं जिंकली. “धन्यवाद भावा! भारताला माहिती आहे की जोवर शिखर धवन क्रीजवर आहे, तोपर्यंत विजय आपलाच आहे. अगदी त्याचप्रमाणे मीदेखील वचन देतो की मी स्वत: शेवटपर्यंत क्रीजमध्ये (मदतकार्यात) राहीन आणि प्रत्येक स्थलांतरित मजूर घरी सुखरूप पोहोचेल याची काळजी घेईन”, असा झकास रिप्लाय सोनु सूदने दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम नि:स्वार्थपणे करत आहे. तो स्वत: या मजुरांच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे. त्याच्या या कामाचं सर्वच स्तरांतून खूप कौतुक होत आहे.