‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेच्या दहा फेऱ्यांनंतर आलेल्या विश्रांतीच्या दिवशी सर्व बुद्धिबळप्रेमींच्या मनात एकच विचार घोळत असेल, तो म्हणजे गुकेश, प्रज्ञानंद किंवा विदित गुजराथी ‘आव्हानवीर’ बनू शकतील का? आतापर्यंत फक्त पाच जणांनी आपल्या पदार्पणात ‘आव्हानवीर’ बनण्याचा पराक्रम केला आहे. ते होते मिखाईल ताल, अनातोली कार्पोवा, गॅरी कास्पारोव्ह, मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोम्नियाशी! यापैकी नेपोम्नियाशी सोडला तर, बाकी सर्वानी पुढे जाऊन पदार्पणात जगज्जेते बनण्याचा पराक्रमही केला होता.

यंदाच्या ‘कॅन्डिडेट्स’मध्ये आतापर्यंत खंबीर खेळणारा गुकेश, प्रज्ञावंत प्रज्ञानंद आणि कायम धडाडीने खेळणारा विदित या तिघांनाही वरील सर्व महाभागांच्या यादीत येण्याची उत्तम संधी आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ नेपोम्नियाशी अपराजित राहिलेला असला, तरी गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा सहज जिंकणारा नेपोम्नियाशी या वेळी तेवढय़ा दृढतापूर्वक खेळताना दिसत नाही. आठव्या फेरीत तर तो अलिरेझा फिरुझाविरुद्ध हरता हरता वाचला. आता नेपोम्नियाशीला पुढील चार फेऱ्यांत विदित, प्रज्ञानंद, नाकामुरा आणि कारुआना यांच्याशी खेळायचे आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा कस लागणार आहे. 

हेही वाचा >>>GT vs DC : दिल्लीचा IPL मधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा

गुकेशला अनुभव कमी असेल, पण त्याची कसर तो भरून काढतो ते त्याच्या विजिगीषू वृत्तीने. अर्थात त्याने सावध खेळणेही आवश्यक आहे. प्रज्ञानंद आणि विदित या दोघांनाही अग्रस्थानाकडे कूच करण्यासाठी एक-दोन विजय मिळवणे जरुरीचे आहे. त्यांचे लक्ष्य हे अर्थात अबासोव आणि अलिरेझा असतील. परंतु, हे दोघेही कोणालाही कधीही हरवू शकतात हे अलिरेझच्या गुकेशवरील विजयामुळे सिद्ध झालेले आहेच.

विश्रांतीनंतर होणारी अकरावी फेरी अत्यंत निर्णायक ठरू शकेल. कारण सामनेही तसेच आहेत. प्रज्ञानंद-नाकामुरा, विदित-नेपोम्नियाशी आणि गुकेश-कारुआना या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंना पांढऱ्या मोहऱ्यांमुळे थोडा का होईना, पण वरचष्मा असेल. याच गोष्टीमुळे ही फेरी भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि खरे बुद्धिबळप्रेमी रात्री जागरण करून रात्री १२ ला सुरू होणारे हे सामने नक्कीच बघतील.

हेही वाचा >>>KKR vs RR : ‘जर हे शतक विराटने झळकावले असते तर…’, बटलरच्या शतकावर हरभजन सिंगने सांगितली मोठी गोष्ट

विश्वनाथन आनंदने २०१४ साली जिंकलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा इतकी एकतर्फी होती की, कार्लसनपाठोपाठ आनंद आणि मग कोणीही नाही असे म्हटले जायचे. त्या वेळी आनंदने पहिला डाव जिंकून जी आघाडी घेतली ती स्पर्धा जिंकेपर्यंत सोडली नव्हती. आठव्या फेरीत लेवोन अरोनियनने त्याला गाठले होते, परंतु तोही अखेर मागे पडला होता. या वेळी संयुक्त आघाडीवर असलेला गुकेश हा आनंदनंतरचा दुसरा ‘आव्हानवीर’ होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फक्त बुद्धिबळपटूंच्या खेळामुळे चर्चेत असलेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला सर्वसामान्यांच्या नजरेत आणण्याचे काम केले ते अलिरेझा फिरुझा आणि त्याचे वडील हमीदरेझा फिरुझा यांनी. स्वत:कडून अवास्तव अपेक्षा ठेवणारा, पण त्यासाठी मेहनत न घेणाऱ्या अलिरेझाची मानसिक स्थिती आपण समजू शकतो. मात्र, त्याचे वडील उगाचच वाद निर्माण करत आहेत. स्वत: बुद्धिबळपटू नसलेला हा माणूस मुलाला प्रत्यक्ष खेळताना बघून काय मिळवणार होता? पण ३० वर्षांपूर्वी भारतात सांघीनगर येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’च्या सामन्यात गॅटा कामस्कीच्या वडिलांनी गॅटाचा प्रशिक्षक रोमन झिनझिन्दाषविली याला मारहाण केली होती. याच आठवणी आता ताज्या झाल्या आहेत.

(लेखक बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)