सुमित नागलच्या सुयशाची कहाणी

रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच यांना पाहत टेनिस खेळायला सुरुवात केली.. या दिग्गजांची कर्मभूमी असणाऱ्या विम्बल्डन स्पध्रेत खेळायला मिळावे अशी इच्छा होती. यंदा या स्पध्रेच्या कनिष्ठ गटात खेळण्याची संधी मिळाली. जेतेपद पटकावेन असे अजिबात वाटले नव्हते. व्हिएतनामच्या नाम होंग लीच्या साथीने विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरले आणि माझे जगच बदलले. एटीपी चॅलेंजर स्पध्रेच्या निमिताने १८ वर्षीय सुमित नागल पुण्यात दाखल झाला आहे. त्या वेळी त्याने कारकीर्दीतील ही भरारी, त्यामागची मेहनत, अडचणींवर केलेली मात, असा सारा प्रवास उलगडला.
‘‘विम्बल्डन जेतेपदानंतर सेलेब्रिटीप्रमाणे लोक माझ्याकडे पाहू लागले. कुठेही गेलो की फोटो, सेल्फी आणि स्वाक्षरींसाठी विचारणा होते. इन्स्टाग्रामवर चाहत्यांची संख्या वेगाने वाढली. टेनिसमधल्या ज्येष्ठ खेळाडूंनी आवर्जून अभिनंदन केले. एक ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद काय किमया घडवू शकते याचा अनुभव मी सध्या घेतो आहे,’’ असे सुमित सांगत होता.
विम्बल्डनच्या आठवणी सांगताना सुमितच्या डोळ्यांत वेगळीच चमक जाणवली. तो म्हणाला, ‘‘विम्बल्डनला ऐतिहासिक परंपरा आहे. खेळाडूंना काटेकोरपणे नियमांचे पालन करावे लागते. सुखावणारे गवत, स्ट्रॉबेरी, असंख्य मान्यवरांची उपस्थिती हे सगळे वातावरण भारावून टाकणारे असते. स्पर्धा संपल्यावर सर्व गटांतील विजेते आणि उपविजेत्या खेळाडूंसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात येते. तो अनुभव अविस्मरणीय होता. जोकोव्हिचला याची देही याची डोळा पाहता आले, त्याच्याशी बोलता आले.’’
ग्रँड स्लॅम स्पध्रेत कनिष्ठ गटात जेतेपद पटकावणारे खेळाडूच भविष्यात वरिष्ठ गटात जेतेपदाचे दावेदार असतात. त्यामुळे आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे, असे सुमितने सांगितले.
ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या सुमितची सुरुवात मात्र क्रिकेटने झाली. त्याबाबत सुमित म्हणाला ‘‘लहानपणी मी क्रिकेट खेळायचो, पण वडिलांना टेनिसची आवड होती. त्यांच्या पुढाकाराने दिल्ली डेव्हलपमेंट टेनिस अकादमीत नाव नोंदवण्यात आले. क्रिकेट सांघिक खेळ आहे आणि टेनिस वैयक्तिक, त्यामुळे सुरुवातीला त्रास झाला पण लवकरच गोडी लागली ती कायमचीच.’’
‘‘दिल्लीतील आर. के. खन्ना स्टेडियममध्ये अपोलो टायर्स कंपनीतर्फे महेश भूपतीच्या मार्गदर्शनाखालील प्रशिक्षण योजनेसाठी चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातल्या हजार खेळाडूंमधून पंधरा जणांची निवड करण्यात आली. त्यापकी मी एक होतो. योजनेअंतर्गत पंधरा खेळाडूंना बंगळुरू येथे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार होते. या दोन वर्षांत टेनिसमधील बारकावे शिकलो. तंदुरुस्तीचे महत्त्व लक्षात आले, असे सुमित म्हणाला.’’
सर्व घडी व्यवस्थित बसत असल्याचे वाटत असतानाच एक वेगळे वळण आले आणि त्यानंतर सुमितला बरेच काही शिकता आले. या वळणाबद्दल सुमित म्हणाला की, ‘‘ ही योजना दहा वर्षांसाठी होती, मात्र आíथक कारणांमुळे कंपनीने दोन वर्षांनंतर माघार घेतली. हा माझ्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. कारण योजनेशिवाय प्रशिक्षण, प्रवास तसेच राहण्याचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. टेनिस सोडावे लागणार अशी परिस्थिती होती. माझे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबाला मर्यादा असतात. त्यावेळी भूपती खंबीरपणे मागे उभे राहिले आणि म्हणूनच टेनिसची आवड जोपासू शकलो. भूपतीसरांच्या पािठब्यामुळेच सुरुवातीला कॅनडा आणि आता जर्मनीत प्रशिक्षण आणि सरावाची संधी मिळाली,’’ असे सुमितने सांगितले.
नव्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या सुमितला बाइक आणि गाडय़ांची प्रचंड आवड आहे. १८व्या वाढदिवशी वडिलांनी बाइक भेट दिली आहे. भारतात आहे तोपर्यंत त्या बाइकवरून सफर करण्याचा मनोदय सुमितने व्यक्त केला.
‘‘आपल्या देशात राहून टेनिसमध्ये कारकीर्द घडवणे खरेच कठीण आहे, कारण शिकवण्याच्या पद्धतीत मूलभूत फरक आहे. पाय काटक राखून खेळण्यावर विदेशात भर दिला जातो. आपल्या इथे हातांच्या हालचाली महत्त्वाच्या मानल्या जातात. सुदैवाने मला संधी मिळाली आहे, त्याचा सकारात्मक उपयोग करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सध्या मी जर्मनीतील ‘शूटलर व्हाके’ अकादमीत मार्गदर्शन घेत आहे,’’ असे सुमित म्हणाला.
‘‘टेनिसच्या ध्यासापोटी घरच्यांपासून लांब राहावे लागत असल्याची खंत आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल खेळाडूंना टक्कर द्यायची असेल तर सर्वोत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठीचा मार्ग खडतर असला तरी त्याला पर्याय नाही,’’असे सुमितने स्पष्ट केले.