ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ही बॅडमिंटन विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मंगळवारपासून सुरु होत आहे. १९८०मध्ये प्रकाश पदुकोण तर २००१मध्ये पुलेला गोपीचंद यांनी या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. मात्र त्यानंतर एकाही भारतीय बॅडमिंटनपटूला जेतेपद पटकावता आलेले नाही. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायना नेहवालने सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धा जिंकत वर्षभराचा जेतेपदांचा दुष्काळ संपवला. पुरेशा विश्रांतीनंतर आता तिच्यासमोर आव्हान आहे ते ऑल इंग्लंड स्पर्धेचे. या स्पर्धेच्या जेतेपदासह इतिहास घडवण्याची संधी सायनाला आहे.
गेल्या वर्षी सायनाचा स्पर्धेतला प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला होता. विश्रांती कालावधीत सायनाने आपल्या तंदुरुस्तीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमूरविरुद्ध सायनाची सलामीची लढत होणार आहे. या लढतीत विजय मिळविल्यास पुढील फेऱ्यांमध्ये सायनासमोर ज्युलियन शेंक, सिझियाना वांग यांचे आव्हान असणार आहे.
युवा पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना चीनच्या यु सनशी होणार आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूने या लढतीचा अडथळा पार केल्यास तिला चीनच्या बलाढय़ यिहान वांगचा मुकाबला करावा लागणार आहे.
पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप आणि किदम्बी श्रीकांत यांना मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. मात्र सलामीच्या लढतीपासून त्यांचा मार्ग खडतर असणार आहे. कश्यपची लढत जपानच्या पाचव्या मानांकित केनेची टागोशी तर श्रीकांतची केंटो मोमोटाशी होणार आहे.
दरम्यान आनंद पवार, अजय जयराम, साईली राणे, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, तरुण कोना, अभिषेक अहलावत आणि क्रिस्ती दास या भारतीय खेळाडूंना पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे.

‘‘स्पर्धेसाठी मी कसून तयारी केली आहे. सरावासाठी मला महिनाभराचा कालावधी मिळाला. सर्वोत्तम खेळ करू शकेन असा विश्वास मला वाटत आहे. स्पर्धेचे वेळापत्रक खडतर आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मी दोनदा मजल मारली आहे. सय्यद मोदी स्पर्धेच्या जेतेपदाने आत्मविश्वास मिळाला आहे.’’