प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीची जेतेपदे काढून टाकण्यात आलेल्या लान्स आर्मस्ट्राँगने आपल्यावरील एक खटला बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
आर्मस्ट्राँगने ‘टूर डी फ्रान्स’ शर्यत जिंकल्याप्रकरणी बोनस म्हणून मिळालेले १२ दशलक्ष रुपये परत करावेत, या मागणीसाठी एससीए प्रमोशन्स कंपनीने आर्मस्ट्राँगवर खटला दाखल केला होता. ‘टूर डी फ्रान्स’ शर्यतजिंकण्यासाठी आर्मस्ट्राँगने प्रतिबंधित उत्तेजकांचा वापर केला. या कारणास्तव तो आणि त्याचा व्यवस्थापक बिल स्टेपल्टन यांच्यावर डल्लासमधील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. ‘टूर डी फ्रान्स’ शर्यतीचे जेतेपद पटकावल्यानंतर एससीए कंपनीने आर्मस्ट्राँगची कंपनी टेलविंडला पैसा पुरवला होता. मात्र आता आर्मस्ट्राँगची सगळी जेतेपदे काढून घेण्यात आली आहेत.
२००५पासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत एससीए कंपनीने बोनस रक्कम परत घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आर्मस्ट्राँगने पलटवार करत त्यांना न्यायालयात खेचले. एससीए कंपनीने आर्मस्ट्राँगने उत्तेजक घेत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता.  
२००६मध्ये एससीएने आर्मस्ट्राँगला खटल्याप्रकरणी विशिष्ट रक्कम देण्याचे ठरवले. आर्मस्ट्राँगने ही रक्कम देणे एससीएला बंधनकारक आहे आणि याविरोधात अपील केले जाऊ शकत नाही, असे आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दुसरीकडे एससीए कंपनीने आर्मस्ट्राँगला फसवल्याचे म्हटले आहे.