इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या द्युती चंदवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्युतीने १०० मी. शर्यतीच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि रौप्य पदकाची कमाई केली. केवळ ०.०२ सेकंदाच्या फरकाने द्युतीचे सुवर्णपदक हुकले. पण तिने भारताला एक रौप्यपदक मिळवून दिले.

या विजयाबाबत बोलताना द्यूतीने एक अजब गोष्ट सांगितली. ती म्हणाली की मी धावताना डोळे बंद ठेवले होते आणि शर्यत संपताना मी माझे डोळे उघडले. २०१४ हे वर्ष माझ्यासाठी फार कठीण होते. माझ्याबद्दल अनेकांनी अनेक तर्कवितर्क लावले. माझ्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आज त्याच मुलीने आज देशासाठी पदक मिळवले आहे हि मोठी गोष्ट आहे, असेही ती म्हणाली.

दरम्यान, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चंदला बक्षिसाची घोषणा केली आहे. ओडीशा सरकारने द्युतीच्या या कामगिरीसाठी १.५ कोटींचं इनाम घोषित केले आहे. याचसोबत ओडीशा ऑलिम्पिक असोसिएशननेही द्युतीला ५० हजाराचं बक्षिस जाहीर केलं आहे.