इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ साखळी सामन्यात अजिंक्य राहिलेला आहे. दुसऱ्या दिवशी आपला शेवटचा साखळी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४४-१८ ने पराभव केला. याआधी झालेल्या साखळी सामन्यांमध्ये भारताने इराक, जपान आणि अफगाणिस्तानचा पराभव केला होता.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारताची जपानवर मात, सलग तिसऱ्या विजयाची नोंद

संपूर्ण सामन्यावर भारताचं वर्चस्व राहिलेलं पहायला मिळालं. भारताने पाकिस्तानला संपूर्ण सामन्यात ३ वेळा ऑलआऊट करत आपलं वर्चस्व कायम राखलं. कर्णधार अजय ठाकूरने सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यात ठराविक अंतराने चढाईत गुणांची कमाई केली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताने सुरिंदर नाडा आणि संदीप नरवाल या खेळाडूंना उजव्या-डाव्या कोपऱ्यावर खेळण्याची संधी दिली. तर चढाईची जबाबदारी ही अजय ठाकूर, मणिंदर सिंह आणि दिपक हुडा यांनी पार पाडली. तर सुरजित सिंहने कव्हरच्या जागेवरुन खेळ केला.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – कबड्डीच्या मैदानात भारताचं शतक, अफगाणिस्तानचा १०३-२५ च्या फरकाने धुव्वा

भारताने पहिल्या मिनीटापासून सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने सामन्यात २४-८ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात पाकिस्तान भारताला टक्कर देईल असं वाटतं होतं, मात्र मणिंदर सिंहने आपल्या मॅरेथॉन रेडच्या जोरावर पाकिस्तानची बचावफळी खिळखिळी करुन टाकली. सामन्याच्या अखेरीस नितीन तोमर आणि सचिन या खेळाडूंनी बदली खेळाडू म्हणून खेळ करत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. या विजयासह भारताची उपांत्य फेरीत रविवारी दक्षिण कोरियाशी गाठ पडणार आहे. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीचं आव्हान कसं पार पाडतो हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारताकडून इराकचा धुव्वा