बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध बॅडमिंटन सौंदर्यवती ज्वाला गट्टा आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. विजय कुमार कोंडा दिग्दर्शित तेलुगू चित्रपट गुंडे जारी गलानाथायिंदेमध्ये ज्वाला नृत्याविष्कार सादर करणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात सुवर्णपदक विजेती ज्वाला सध्या या नृत्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या गाण्यामध्ये ज्वाला तिचा मित्र नितीनसह दिसणार आहे. ‘हे गाणे खूपच छान आणि गुणगुणावे असे वाटणारे आहे. चित्रीकरणाच्या वेळेला खूप गर्दी होती. मला अनेकदा तालीम करावी लागली पण प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी मला खूप मजा आली. बॅडमिंटन हे माझे पहिले प्रेम आहे. तेच माझे आयुष्य आहे. निवृत्त झाल्यानंतरही मी बॅडमिंटनशी निगडितच काम करेन. पण त्यावेळी चित्रपटाची ऑफर आली, दिग्दर्शकाची मला माहिती असेल आणि त्याचा माझ्या कामावर विश्वास असेल तर मला चित्रपटातही काम करायला आवडेल’, असे ज्वालाने सांगितले.