भारताचा माजी कर्णधार बायच्युंग भुतियाला आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने दिली. एएफसीतर्फे ३० नोव्हेंबर रोजी साठावा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. या वेळी विविध पुरस्कार दिले जाणार असून बायच्युंगचाही या वेळी गौरव केला जाईल. बायच्युंगसोबत आशियातील अन्य नऊ नामांकित खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. बायच्युंगच्या या सन्मानाबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘‘बायच्युंगने शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतरही त्याने या खेळाच्या प्रसारासाठी वाहून घेतले आहे.’’