माझ्या आयुष्यावर आधारित एखादा चित्रपट काढल्यास, त्याचा बॅडमिंटन या खेळाचा देशभर प्रसार होण्यास मदत होईल, असे मत भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने व्यक्त केले. ती म्हणाली, ‘‘माझ्या आयुष्यात आतापर्यंत काय घडले, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यावर आधारित फक्त खेळाच्या दृष्टिकोनातून चित्रपटाची निर्मिती केल्यास, त्याचा देशातील बॅडमिंटनला भरपूर फायदा होईल. बॅडमिंटन हा तांत्रिक खेळ आहे. त्यामुळे चित्रपटात या तांत्रिक बाबींचा समावेश करावा लागेल. दीपिका पदुकोण ही स्वत: बॅडमिंटन चांगली खेळत असल्यामुळे तीच माझी भूमिका नीटपणे साकारेल. त्याचबरोबर शाहरूख खान या चित्रपटाचा नायक असावा, असे मला वाटते.’’ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये दोन पदके मिळतील, असा विश्वास सायनाने व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘पी. व्ही. सिंधूची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळे महिला बॅडमिंटनपटू भारताला दोन पदके मिळवून देतील, असा विश्वास आहे.’’