माजी कर्णधार एम.एस धोनीची कॅप्टन कूल ही इमेज आपण सर्वच जाणून आहोत. आपल्या याच स्वभावाने धोनीने आतापर्यंत भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मात्र भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला पुन्हा एकदा धोनीच्या रागाचा सामना करावा लागलेला आहे. अफगाणीस्तान संघ फलंदाजी करत असताना १७ व्या षटकांत कुलदीप यादवमुळे धोनीचा पारा अचानक चढला. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने धोनीला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायला सांगितले. त्यानंतर धोनी भडकला. आणि म्हणाला, ‘गोलंदाजी करतो की दुसऱ्याला बोलवू’. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आशिया चषकातील सुपर फोरच्या सामन्यात अफगाणीस्तान संघाने बलाढ्य भारताला बरोबरीत रोखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. काल मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने संघामध्ये पाच बदल केले होते. रोहित शर्माला आराम दिल्यामुळे कर्णधारपदाची सुत्रे पुन्हा एकदा धोनीकडे होती. भारतीय फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे अफगाणीस्तानचा संघ २५२ धावांपर्यंत मजल मारू शकला. तब्बल दोन वर्षानंतर कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या धोनीने आपल्यात नेतृत्व गुण आणखी शिल्लक असल्याचे दाखवून दिले. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले.  रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शेहजादला सामनावीर घोषित करण्यात आले.

 

याआधीही धोनी क्षेत्ररक्षणावरून कुलदीपवर भडकला होता. याचा खुलासा खुद्द कुलदीप यादवने एका शो दरम्यान केला होता. डिसेंबर २०१७ रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात इंदूरयेथे दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यादरम्यान धोनी आपल्या सवयीप्रमाणे यष्टींमागून कुलदीपला नेमका चेंडू कसा टाकायचा याच्या सुचना देत होता. एका क्षणाला कुलदीपने धोनीने दिलेली सुचना न ऐकता आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहीसा रागावलेल्या धोनीने कुलदीपला चांगलचं सुनावलं. “मला मूर्ख समजलास का?? मी ३०० वन-डे सामने खेळल्यानंतर इथे पोहचलोय.” आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोनीने दिलेल्या सल्ल्यानूसार गोलंदाजी केल्यानंतर कुलदीपला लगेच विकेट मिळाली. या सामन्यात कुलदीपने ४ षटकात ५२ धावा देत ३ बळी घेतले.