BWF World Tour Finals : गुआंगझू येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधूने अमेरिकेच्या झँग बीवन हिला २१-९, २१-१५ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये सिंधूने बीवन हिला २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर बीवनने सिंधूला दुसऱ्या गेममध्ये चांगली टक्कर दिली. पण अखेर सिंधूच्या अनुभवापुढे तिचे प्रयत्न फोल ठरले. दुसरा गेम २१-१५ असा जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली.

त्याआधी सलग सहा सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करीत भारताच्या पी.व्ही. सिंधूने ताय झु यिंगवर मात केली होती. पहिल्या गेममधील पिछाडीनंतरदेखील चायनीज तैपेईच्या ताय झु यिंगला हरवणे अशक्य असल्याच्या वदंतेला सिंधूने उद्ध्वस्त केले. सिंधूने हा सामना १४-२१, २१-१६, २१-१८ असा जिंकला होता.