टोरंटो : भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू डी. गुकेशने सर्वात युवा आव्हानवीर होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेच्या १३व्या फेरीत चमकदार कामगिरी करताना फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझावर विजय नोंदवत अग्रस्थान भक्कम केले. त्याच वेळी रशियाचा इयान नेपोम्नियाशी आणि अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. हा निकाल गुकेशच्या पथ्यावर पडला आहे.

स्पर्धेतील आता केवळ एक फेरी शिल्लक असून गुकेश आता ८.५ गुणांसह एकटयाने अग्रस्थानावर आहे. नेपोम्नियाशी, नाकामुरा आणि अमेरिकेचाच फॅबियानो कारुआना आठ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे अखेरच्या फेरीत हे बुद्धिबळपटू एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने जेतेपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गुकेशची गाठ नाकामुराशी, तर नेपोम्नियाशीची गाठ कारुआनाशी पडणार आहे.

चेन्नईच्या १७ वर्षीय गुकेशने ही स्पर्धा जिंकली, तर तो सर्वात युवा विजेता ठरेल. त्याला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्या डिंग लिरेनला आव्हान देण्याची संधी मिळेल. मात्र, १४व्या फेरीअंती गुणांच्या आधारे दोन खेळाडूंत बरोबरी असल्यास सोमवारी ‘टायब्रेकर’ खेळविण्यात येईल.

हेही वाचा >>> आता वजन राखण्याचे आव्हान – विनेश फोगट

१३व्या फेरीत कारुआनाने चुरशीच्या लढतीत भारताच्या आर. प्रज्ञानंदला नमवले. तर विदित गुजराथीने अझरबैजानच्या निजात अबासोवविरुद्ध बरोबरीची नोंद केली. विदितने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना सावध सुरुवात केली. अबासोवने त्याच्यावर आक्रमक चढवले, पण विदितला बरोबरी राखण्यात यश मिळाले. अन्य लढतीत, कारुआनाने आक्रमक सुरुवातीनंतर प्रज्ञानंदने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, अखेर त्याला पराभव पत्करावा लागला. या निकालांनंतर प्रज्ञानंद आणि विदित सहा गुणांसह संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी आहेत. सातव्या स्थानावरील फिरुझाचे ४.५ आणि आठव्या स्थानावरील अबासोवचे ३.५ गुण आहेत.

महिला विभागात कोनेरू हम्पीने अ‍ॅना मुझिचुकविरुद्ध बरोबरीची नोंद केली. प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशालीने जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या चीनच्या ले टिंगजीविरुद्ध अनपेक्षित विजय नोंदवला. २२ वर्षीय वैशालीचा हा सलग चौथा विजय ठरला. टॅन झोंगीने रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाविरुद्ध बरोबरी नोंदवली. झोंगी ८.५ गुणांसह आघाडीवर असून टिंगजी ७.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नुरग्युल सलिमोवा आणि कॅटेरिया लायनो यांच्यातील डावही बरोबरीत राहिला. गोर्याचकिना, लायनो, हम्पी आणि वैशाली या ६.५ गुणांसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत. सलिमोवा आणि मुझिचुक पाच गुणांसह संयुक्त सातव्या स्थानी आहेत.

१३ व्या फेरीचे निकाल

खुला विभाग : विदित गुजराथी (५.५) बरोबरी वि. निजात अबासोव (३.५), डी. गुकेश (८.५) विजयी वि. अलिरेझा फिरुझा (४.५), आर.प्रज्ञानंद (६) पराभूत वि.फॅबियानो कारुआना (८), इयान नेपोम्नियाशी (८) बरोबरी वि. हिकारू नाकामुरा (८).

महिला विभाग : टॅन झोंगी (८.५) बरोबरी वि. अलेक्झांड्रा गोर्याचकिना (६.५). कोनेरू हम्पी (६.५) बरोबरी वि. अ‍ॅना मुझिचुक (५), आर. वैशाली (६.५) विजयी वि. ले टिंगजी (७.५), नुरग्युल सलिमोवा (५) बरोबरी वि. कॅटेरिया लायनो (६.५).

१४ व्या फेरीच्या लढती

खुला विभाग : डी. गुकेश वि. हिकारू नाकामुरा, इयान नेपोम्नियाशी वि. फॅबियानो कारुआना, विदित गुजराथी वि. अलिरेझा फिरुझा, आर.प्रज्ञानंद वि. निजात अबासोव.

महिला विभाग : टॅन झोंगी वि. अ‍ॅना मुझिचुक, आर. वैशाली वि. कॅटेरिया लायनो, कोनेरू हम्पी वि. ले टिंगजी, अलेक्झांड्रा गोर्याचकिना वि. नुरग्युल सलिमोवा.

डाव ऐन रंगात आला असताना डोके शांत ठेवून १७ वर्षीय गुकेशने एकाहून एक अचूक चाली खेळल्या आणि जागतिक बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण आव्हानवीर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. गुकेशने एक फेरी शिल्लक असताना नाकामुरा, कारुआना आणि नेपोम्नियाशी या त्रिकुटावर अर्ध्या गुणाची आघाडी घेतली आहे. अलिरेझा फिरुझाने सहाव्या फेरीत गुकेशला पराभूत केले होते. त्यामुळे १३व्या फेरीत मिळवलेल्या विजयाचा आनंद गुकेशला अधिक झाला असेल आणि अखेरच्या फेरीत नाकामुराविरुद्ध खेळण्याआधी त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल. वयाच्या १८व्या वर्षीच २८०० गुणांचा टप्पा गाठणाऱ्या फिरुझाने त्यानंतर फॅशन डिझायनिंगवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्याला बुद्धिबळात हवे तेव्हढे यश मिळालेले नाही. परंतु त्याला हरवणे सोपे नाही. त्यामुळे त्याच्यावरचा विजय गुकेश हा जगज्जेत्या डिंग लिरेनचा आव्हानवीर होण्यासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे सिद्ध करणारा होता. महिलांमध्ये वैशालीने विजेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या ले टिंगजीला हरवून एकच खळबळ उडवून दिली. चार पराभवांमुळे शेवटच्या क्रमांकावर गेलेल्या वैशालीने लागोपाठ चार विजय मिळवून संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुकेश आणि वैशालीमुळे भारतीयांच्या विजीगिषू वृत्तीची साक्ष संपूर्ण जगाला मिळाली आहे. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक.