रांची : कसोटीसारख्या कठीण क्रिकेट प्रारूपात सहजासहजी संधी मिळत नसते. यशासाठी जे खेळाडू भुकेलेले असतात त्यांच्यासाठी संधी वाट बघत असते, अशा शब्दांत भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघात प्रवेश मिळविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व खेळाडूंना कडक इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून भारताने मायदेशात सलग १७ कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने सर्फराज खान, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप या प्रत्येक युवा खेळाडूने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आणि त्याच वेळी आपल्याला संघ कसा असावा याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले.

हेही वाचा >>>Ranji Trophy : मध्य प्रदेशची सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक! कर्नाटकला २६८ धावांची गरज, तर मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी

‘‘ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन कधीच विचार करणार नाही. जर, खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल आणि त्यांना काहीच करायचे नसेल, तर त्यांना संघात घेऊन काय करायचे आहे,’’असे स्पष्ट मत रोहितने मांडले.

आपली लय सिद्ध करण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा ‘बीसीसीआय’चा सल्ला धुडकावणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या भूमिकेनंतर रोहितने सोमवारी दिलेल्या इशाऱ्याला खूप महत्त्व येते. ‘‘ज्या खेळाडूला यशाची भूक नाही तो खेळाडू मला संघात नको आहे. जे संघात आहेत आणि जे नाहीत त्या सर्वानी या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे. आधीच कसोटी क्रिकेटमध्ये खूप कमी संधी मिळतात आणि मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा नसेल, तर संघापासून दूर राहा,’’असा कडक इशारा रोहितने दिला.

रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे सोडून किशन मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांडय़ासोबत नुकताच बडोद्यात ‘आयपीएल’चा सराव करताना आढळून आला. ‘आयपीएल’सारख्या लीग युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटपासून दूर नेत आहेत का असे विचारल्यावर रोहितने कुणाचेही नाव घेतले नाही. पण, कसोटी क्रिकेट हे कठीण आहे. तेथे खेळण्यासाठी तुम्हाला झोकून द्यावे लागते. संधी मिळाल्यावर ती तुम्ही टिकवून ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, तर काही एक उपयोग नाही. येथे तुम्हाला खेळावेच लागते. संघ व्यवस्थापानाने संघ कसा असावा हे निश्चित केले आहे. त्यात बदल होत नाही, असे रोहित म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain rohit sharma clear statement regarding the team composition sport news amy