सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात २०२० या वर्षांअखेरीस अग्रस्थानी कोण राहणार यासाठी चुरस आहे. जोकोव्हिच ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे सुरू झालेल्या ‘एटीपी’ स्पर्धेत सहभागी झाला आहे. नदाल शनिवारपासून (३१ ऑक्टोबर) फ्रान्समध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेत सहभागी होईल.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला नुकतेच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्याचे अग्रस्थान कायम आहे. याउलट विक्रमी १३ वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या नदालचे दुसरे स्थान कायम आहे. मात्र जोकोव्हिचने व्हिएन्ना येथील स्पर्धेत किमान उपांत्यपूर्व फेरी जरी गाठली तर त्याचे या वर्षांअखेपर्यंत अग्रस्थान कायम राहू शकते.

याउलट नदालला अग्रस्थान पटकावण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी पॅरिस मास्टर्स स्पर्धा जिंकावी लागेल. त्यापाठोपाठ जागतिक ‘एटीपी’ स्पर्धेचे विजेतेपदही नदालला अग्रस्थान पटकवण्यासाठी मिळवावे लागेल. त्यातच या दोन्ही स्पर्धामध्ये जरी नदालचा पराभव झाला तरी जोकोव्हिचचे २०२०मधील अग्रस्थान कायम राहील.