‘आयपीएल स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर रुजलेली असून या प्रकरणामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण फसवणुकीची भावना असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
या प्रकरणातील दोन सट्टेबाज बंधू पवन आणि संजय जयपूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने आपले मत मांडले. या प्रकरणाचा तपास ढिसाळपणे करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाला न्यायालयाने धारेवर धरले. पोलीस अक्षरश: हवेत तीर मारल्याप्रमाणे प्रकरणाचा तपास करीत आहेत, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले. दोघेही बंधू सामन्यादरम्यान प्रकरणातील आरोपी विंदू दारा सिंग आणि पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्या सतत संपर्कात होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. त्या वेळेस दोघांवर जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून हा गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. तसेच त्यांना अटकपूर्व जामीन देण्याची विनंती केली. परंतु जुगार हा जामीनपात्र गुन्हा असला तरी क्रिकेट हा खेळ मनापासून पाहणाऱ्या आणि त्याचा आनंद लुटणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या मनात ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणामुळे अप्रत्यक्षपणे का होईना, पण फसवणूक झाल्याची भावना असल्याचे मत न्यायमूर्ती जाधव यांनी नोंदवले. याशिवाय या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाळेमुळे रुजली असल्याचे आणि तपासाची जी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली आहेत त्यातून हे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
 पंच रौफ यांच्यापुरतीच प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पाळेमुळे मर्यादित नाहीत, तर फोनच्या नोंदी आणि संभाषण यावरून अन्य देशातील लोकही यात गुंतलेले असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच जयपूर बंधूंच्या कोठडीमुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे सोपे जाईल, असेही नमूद करीत न्यायालयाने जयपूर बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्याचे संकेत दिले. या प्रकरणी ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.