भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता संघाचे कर्णधारपद कोहलीकडे सोपविण्याची वेळ आली असल्याची चर्चा क्रिकेट विश्वातील अभ्यासक आणि चाहते करत असताना माजी कर्णधार कपील देव यांनी मात्र धोनीला पाठिंबा दिला आहे. धोनी योग्यरित्या संघाचे कर्णधारपद सांभाळत असून त्याने यापुढेही खेळत राहावे, अशी इच्छा कपील देव यांनी व्यक्त केली आहे.

कोहलीने आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची वेळ आली आहे का? यावर बोलताना कपील देव म्हणाले की, धोनीने आता कर्णधारपद सोडण्याची वेळ आली आहे, हे आपण धोनीला सांगण्यासाठी तयार आहोत का? याचा आधी विचार करायला हवा. मला वाटतं की धोनीने संघाचा कर्णधार म्हणून यापुढेही खेळत राहावे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा धोनी तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर करेल. पण सध्याच्या घडीला धोनीनेच संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणे योग्य आहे. धोनीकडे पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे यापुढेही त्याने खेळत राहावे.

वाचा: विराट कोहली सचिनपेक्षाही उत्कृष्ट खेळाडू होऊ शकतो- कपील देव

धोनी आणि विराटच्या कर्णधारपदाच्या गुणांबाबत बोलताना कपिल देव यांनी इतक्यात यावर बोलणे योग्य ठरणार नसल्याचे म्हटले. प्रत्येकाचे गुण, सामर्थ्य आणि विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे तुलना करणे योग्य वाटत नाही. कोहली खूप आक्रमक आहे, तर धोनी तितकाच शांत आहे. त्यामुळे दोघांची तुलना करणे कठीण आहे. तुम्ही उद्या विराट आणि धोनीच्या कर्णधारी गुणांची तुलना सौरव गांगुलीच्या गुणांशी करण्यास सांगाल. पण ते अशक्य आहे. क्रिकेटचे चित्र सध्या खूप बदलले आहे. प्रत्येक कर्णधार आपापल्यापरिने संघात आपल्या कामगिरीने योगदान आणि संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतो. यात प्रत्येकाचा स्वभाव आणि पद्धत वेगवेगळी असते. पण उद्देश मात्र एकच असतो. तुम्ही आक्रमकच असले पाहिजे, असे अनिवार्य नसते. संघाला विजय प्राप्त करुन देण्यासाठी तुम्ही कसा विचार करता? हे महत्त्वाचे असते, असेही कपिल देव पुढे म्हणाले.

[jwplayer B6ogGAsr]