लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय महामार्ग गोवाद्वारे कोकण रेल्वेवरील माजोर्डा ते मडगाव विभागात उड्डाणपूलाचे (आरओबी) बांधकाम करण्यात येणार आहे. मडगाव वेस्टर्न पर्यायी मार्गासाठी तुळया उभारण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेवर जवळजवळ संपूर्ण मे महिना हा ब्लॉक सुरू राहणार आहे. परिणामी कोकण रेल्वेवरील नेत्रावती एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांसह बहुसंख्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकणात मूळगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासह महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक ७ मे रोजी पार पडणार असल्याने कोकणात जाणाऱ्या मतदारांची गाड्यांना गर्दी आहे. मात्र, कोकण रेल्वेने गोव्यातील माजोर्डा आणि मडगाव या विभागादरम्यान २ मे ते २९ मे पर्यंत ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकच्या या कालावधीत गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस करमळी ते रत्नागिरी दरम्यान सुमारे ७० मिनिटे उशिराने धावेल. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा खोळंबा होईल. या रेल्वेगाडीचा एकूण १,८०४ किमीचा प्रवास सुमारे ३० तास १० मिनिटांचा असतो. परंतु ब्लॉकमुळे यात ७० मिनिटे अधिक वाढल्याने प्रवाशांना अधिकचा एक तास वाढेल.

आणखी वाचा-मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच याच कालावधीत गाडी क्रमांक १७३१० वास्को दा गामा – यशवंतपूर एक्स्प्रेसचा प्रवास वास्को द गामावरून रात्री १०.५५ वाजता सुरू होण्याऐवजी रात्री ११.३५ वाजता होईल. त्यामुळे ही रेल्वेगाडी ४० मिनिटे उशिराने सुटल्याने, पुढील स्थानकात विलंबाने पोहचेल. यासह इतर रेल्वेगाड्यांवर परिणाम होईल.