टीम इंडिया सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गाजवत आहे. आफ्रिकेविरूद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेत भारताने २०० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. पण त्याच सोबत भारतात देशांतर्गत सुरू असलेल्या विजय हजारे स्पर्धेत भारताचा दिनेश कार्तिक तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. शेवटच्या काही षटकात मैदानावर येत तो दमदार खेळी करण्यात यशस्वी होत आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत किंवा धोनीनंतर टीम इंडियाचा ‘फिनिशर’ म्हणून दिनेश कार्तिकच योग्य पर्याय असल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये दिसून येत आहे.

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत दिनेश कार्तिक तामिळनाडू संघाचे सक्षम नेतृत्व करताना दिसत आहे. त्याचसोबत तो फिनिशर म्हणूनही धमाकेदार कामगिरी करत आहे. तामिळनाडूने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत. महत्वाचे म्हणजे शेवटच्या काही षटकांचा खेळ शिल्लक असताना मैदानावर येत फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकने पाच पैकी चार सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.

कार्तिकने ५ सामन्यात ३४९ धावा ठोकल्या आहेत. विजय हजारे करंडक स्पर्धेत दिनेश कार्तिक तमिलनाडूसाठी ‘फिनिशर’ची भूमिका उत्तमरित्या पार पाडताना दिसतो आहे. कार्तिकने पाच डावात चार अर्धशतके केली असून सगळ्या सामन्यात ४० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पाचपैकी केवळ तीनच वेळा त्याला बाद करता आले. कार्तिकने या स्पर्धेत ५२*(५२), ९५(९१), ९७(६२), ४०(२३), ६५*(२८) अशा खेळी केल्या आहेत. त्याने ११६ च्या सरासरीने आणि १३६ च्या स्‍ट्राइक रेटने ३४९ धावा केल्या आहेत. या आकडेवारीमुळे सध्या धोनीची फिनिशरची जागा कार्तिक घेऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, तामिळनाडूचा पुढील सामना १६ ऑक्टोबरला होणार आहे.