ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी आज निवड समितीची बैठक
इंग्लंडविरुद्धच्या मानहानीकारक कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी निवड समितीची बैठक रविवारी होणार असून, भारतीय संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता दिसत नाही. पण कामगिरीच्या जोरावर मात्र काही युवा खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते, तर बरेच खेळाडू आपले संघातील स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरतील, असे चित्र आहे.
 वीरू-गौतीकडेच सलामीची धुरा
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला एकाही डावात चांगली सलामी देता आली नव्हती, पण असे असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दोघांचेही स्थान पक्के समजले जात आहे. सेहवागने इंग्लंडविरुद्धच्या पाहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला मोठी खेळी साकारता आली नव्हती. सेहवागपेक्षाही सुमार कामगिरी गंभीरची आहे. पण तरीही अनुभवाच्या जोरावर या दोघांनाच पसंती देण्यात येईल. त्यांना पर्याय म्हणून इराणी करंडकातील शतकवीर मुरली विजय संघात राहील, त्याचबरोबर अजिंक्य रहाणेलाही संघात कायम ठेवण्यात येईल.
 मधल्या फळीत चुरस फक्त सहाव्या स्थानासाठी
फलंदाजीच्या मधल्या फळीत कोणताही बदल करण्यात येणार नाही. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाचव्या स्थानावर विराट कोहली कायम राहतील. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत युवराज सिंगऐवजी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली, त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्यामुळे सहाव्या स्थानासाठी त्याला सर्वात जास्त पसंती देण्यात येईल. इराणी करंडकात शतक झळकावत सुरेश रैनाने या स्थानासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. या स्थानावर रणजी मोसमात ९६६ धावा आणि १९ बळी मिळवणाऱ्या अभिषेक नायरच्या नावाचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. सातव्या स्थानासाठी चाणाक्ष कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीला सध्या पर्यायच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याच्या स्थानाला कोणताही धोका अजिबात नाही.
 फिरकी चक्कर
ऑफ-स्पिनर आर. अश्विन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा यांचे अंतिम ११ जणांच्या संघातील स्थान पक्के आहे. पण भारतीय खेळपट्टय़ांचा विचार करता १५ खेळाडूंच्या चमूत अजूनही दोन फिरकीपटूंना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या फॉर्मात नसला तरी अनुभवाच्या पूर्वपुण्याईवर ऑफ-स्पिनर हरभजन सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संघात एखादा लेग-स्पिनर घेण्याचा विचार निवड समितीने केला तर अमित मिश्रा किंवा पीयूष चावला यांच्यापैकी एकाचा नक्कीच संघात नंबर लागू शकतो.
 युवा वेगवान मारा
वेगवान गोलंदाजांमध्ये इशांत शर्माचे नाव पक्के आहे. बीसीसीआयने त्याला सरावासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले असून तो वेगवान माऱ्याचे सारथ्य करू शकतो. त्याला साथ देण्यासाठी रणजीमध्ये सर्वाधिक ४८ बळी मिळवणारा ईश्वर पांडे, एकदिवसीय संघात चांगली कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार आणि दुखापतीतून सावरलेला एस. श्रीशांत यांचा विचार होऊ शकतो. परविंदर अवानाला इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी झहीरऐवजी संघात पाचारण करण्यात आले होते. मात्र संधी न मिळताच त्याला सोडचिठ्ठी देण्यात येऊ शकते.
 जखमी शेर
भारताचे वेगवान गोलंदाज दुखापतींनी हैराण झाले आहेत. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज झहीर खान रणजी स्पर्धेत जायबंदी झाला होता, त्याच्याबरोबरच उमेश यादव, इरफान पठाण हे जखमी शेर बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुखापतीवर उपचार घेण्यासाठी वरुण आरोन इंग्लंडमध्ये गेला आहे. मुनाफ पटेलसुद्धा दुखापतीमुळे बरेच महिने संघाबाहेर आहे, तर प्रवीण कुमार दुखापतीतून सावरला असला तरी त्याचा सध्याचा फॉर्म आणि मानसिक संतुलन संघात येण्यासाठी साजेसे नाही.
 प्रतीक्षा यादीतील चेहरे
वसिम जाफर, युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांना भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणे कठीण असेल. वसिम जाफर सातत्याने प्रत्येक मोसमात धावांची लयलूट करीत असला तरी त्याच्याकडे निवड समिती कानाडोळा का करते, हे अनाकलनीय आहे. युवराज सिंगसाठी तर कसोटी क्रिकेटची दारे जवळपास बंद झाली आहेत. रोहित शर्माला अजूनही कसोटी पदार्पण करता आले नसून या वेळी त्याची संघात वर्णी लागण्याची शक्यता दिसत नाही. यंदाच्या रणजी हंगामात ९४३ धावा फटकावलेला सी. गौतम हा सलामीवीरही दुर्लक्षितच राहण्याची शक्यता आहे.