स्पेनमधील १९८२च्या विश्वचषकात अल्जेरिया आणि पश्चिम जर्मनी एकमेकांसमोर उभे ठाकले होते.. त्या वेळी अल्जेरियाने पश्चिम जर्मनीवर २-१ असा अनपेक्षित विजय मिळवला होता.. तब्बल ३२ वर्षांनी हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत.. पण ३२ वर्षांनंतरही जर्मनीच्या मनात अजूनही पराभवाचे शल्य कायम असून त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते उत्सुक आहेत, पण या सामन्यात त्यांना आघाडीपटू लुकास पोडोलुस्कीची उणीव जाणवेल. मांडीतील स्नायू दुखावल्यामुळे त्याला २-३ दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जर्मनीचा थॉमस म्युलर भन्नाट फॉर्मात आहे, त्याचबरोबर विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम रचण्यासाठी मिरास्लोव्ह क्लोस आतुर असेल. दोन्ही संघांचा विचार करता अल्जेरियापेक्षा जर्मनीचे पारडे नक्कीच जड आहे.
सामना क्र. ५४
जर्मनी वि. अल्जेरिया
स्थळ : इस्टाडियो बैरा रियो, पोटरे अलेर्गे
*वेळ : मध्यरात्री १.३० वा.पासून
लक्षवेधी खेळाडू
थॉमस म्युलर (जर्मनी) : जर्मनीकडून एका हॅट्ट्रिकसह सर्वाधिक चार गोल थॉमस म्युलरच्या नावावर आहेत. पोर्तुगालविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात म्युलरने हॅट्ट्रिक साजरी केली होती. प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्याकडून बहारदार खेळ पाहायला मिळाला आहे. त्यामुळे संघाला त्याच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा असतील.
इस्लाम स्लिमानी (अल्जेरिया) : अल्जेरियाकडून यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक दोन गोल इस्लाम स्लिमानीच्या नावावर आहेत. इस्लामने आतापर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर जोरदार आक्रमणे लगावली आहेत. त्याचबरोबर बऱ्याचदा गोलसाहाय्यही केले आहे. त्यामुळे जर अल्जेरियाला जर्मनीवर आक्रमण करायचे असेल तर त्यांच्याकडे स्लिमानी हे प्रमुख अस्त्र असेल.
गोलपोस्ट

अल्जेरियाने आमचा १९८२मध्ये पराभव केला होता आणि तो मी विसरू शकत नाही, पण त्यानंतर दोन्ही संघांमध्ये फार बदल झाले आहेत. खेळाडू, खेळाची रणनीती, व्यूहरचना सारेच बदलले आहे. सध्या आमचा संघ चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यामध्ये सातत्य राखण्यावर आमचा भर असेल. संघाचा सरावही चांगला झाला असून आम्ही या सामन्यासाठी तयार आहोत.
जोआकिम लो, जर्मनी    

जर्मनीचा संघ बलाढय़ आहे. आतापर्यंत त्यांनी विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्हाला दर्जेदार खेळ करावा लागेल. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी मी आशादायी आहे. जर्मनीविरुद्ध आम्हाला चोख खेळ करावा लागेल. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून सर्वाना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहेत.
हसन येबाडा, अल्जेरिया