सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्या ऑलिम्पिक पदकांमुळे बॅडमिंटनबाबतची लोकप्रियता वाढू लागली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे आता बॅडमिंटन या खेळात सकारात्मक बदल दिसून येतोय.

बॅडमिंटन हा जरी पुण्यात जन्म झालेला क्रीडा प्रकार असला तरीही या खेळात अनेक वर्षे चीनची मक्तेदारी होती. किंबहुना अनेक देशांचे खेळाडू त्यांच्या खेळाडूंपासून दबकूनच राहत असत. आता परिस्थिती बदलली आहे. भारत, जपान यांच्यासह अनेक देशांनी त्यांची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. पण भारताला या खेळात सत्ता गाजवायची असेल तर अजून बराच लांबचा पल्ला गाठावयाचा आहे.

world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
What is the controversy over the ban fast in Ramadan on footballers in France
रमजानमध्ये उपवास करता येणार नाही? फ्रान्समध्ये फुटबॉलपटूंवरील मनाईचा वाद काय?
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

जागतिक स्तरावर आपली मान उंचावायची असेल तर प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रात सत्ता गाजविली पाहिजे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत चीनने गेल्या वीस वर्षांमध्ये अनेक क्रीडा प्रकारांमध्ये सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी खेळांमध्ये प्रत्येक ऑलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नवे विजेते घडविण्याची किमया चीनच्या खेळाडूंमध्ये असते असा बराच काळ अनुभव होता. मात्र गेल्या पाच सहा वर्षांमध्ये बॅडमिंटनमध्ये भारत, इंडोनेशिया, जपान, स्पेन, डेन्मार्क, नेदरलँड्स आदी देशांच्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी केली आहे. ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष व महिला एकेरी या दोन्ही महत्त्वपूर्ण गटांमध्ये चीनच्या खेळाडूंना विजेतेपद मिळविता आले नाही. ही चीनसाठी धक्कादायक गोष्ट असली तरी अन्य देशांचे नवनवीन चेहरे या क्रीडा प्रकारात विजेतेपदावर मोहोर नोंदवीत आहेत. त्यामुळे स्पर्धामधील रंगत वाढली आहे. अधिकाधिक देशांचे खेळाडू चमक दाखवू लागल्यामुळे त्यांचा खेळ पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांचीही संख्या वाढत आहे. खेळाडूंची कामगिरी, प्रेक्षकांचा सहभाग व प्रायोजक यांचे अतूट नाते आहे. खेळाडूंची कामगिरी चांगली व्हायला लागली की आपोआप त्यांच्या चाहत्यांचाही खेळातील सहभाग वाढत जातो व प्रेक्षक वाढले की प्रायोजकही वाढत्या प्रमाणात या स्पर्धासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढे येतात. भारतात हाच अनुभव पाहावयास मिळाला आहे. प्रकाश पदुकोण व पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंडसारख्या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळविले मात्र त्यांच्या विजेतेपदाने जे शक्य झाले नाही ते सायना नेहवाल व आता पी.व्ही. सिंधू यांच्या ऑलिम्पिक पदकांमुळे होते आहे. त्यांच्यामुळे बॅडमिंटनबाबतची लोकप्रियता वाढू लागली आहे. या दोन्ही खेळाडूंच्या ऑलिम्पिक पदकांनंतर या दोन्ही खेळाडूंकडे प्रायोजकांची रीघ लागली आहे.

सायना व सिंधू यांनी गेल्या काही वर्षांमध्ये चीनची या खेळातील दादागिरी संपविताना भारत हा बॅडमिंटनमधील शक्तिस्थान असल्याचे सिद्ध केले आहे. या दोन्ही खेळाडूंबरोबरच बी.साईप्रणीत, किदम्बी श्रीकांत आदी खेळाडूंनी पुरुष गटात दबदबा निर्माण केला आहे. भारतीय खेळाडूंची दखल अन्य परदेशी खेळाडू घेताना दिसून येत आहे. जागतिक स्पर्धेत या सर्वच खेळाडूंकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र सिंधू हिने रौप्य तर सायना हिने कांस्यपदक मिळवीत आपला ठसा उमटविला. ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत सिंधू खूप मानसिक दडपण घेते हे येथे दिसून आले. जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध अंतिम फेरीत विजय मिळविण्याच्या भरपूर संधी सिंधूला मिळाल्या. तथापि या संधीचे सोने तिला करता आले नाही. ओकुहारा हिच्यापेक्षा सिंधू उंच होती. त्याचा लाभ तिने घ्यायला पाहिजे होता. जरी ओकुहारा हिने सिंधूला स्मॅशिंगचे फटके मारता येणार नाही याची काळजी घेतली होती तरीही ज्या वेळी काही वेळा तिला ही संधी मिळाली होती. त्याचा फायदा तिला घेता आला नाही. सिंधूच्या तुलनेत ओकुहारा जास्त तंदुरुस्त होती. सिंधू प्रचंड दडपणाखाली खेळत होती हे तिच्या चेहऱ्यावर सतत जाणवत होते. त्याचप्रमाणे ओकुहारा हिने केलेल्या कल्पक खेळामुळे तिची दमछाकही होत होती. त्यामुळेच तिला सतत घाम पुसायला लागत होता तसेच पाण्याचा ब्रेक घ्यावा लागत होता.

सिंधूला येथे सोनेरी यश मिळविता आले नाही. तरीही तिचे रौप्यपदकदेखील कौतुकास्पद कामगिरी आहे. तिने यापूर्वी दोन वेळा याच स्पर्धेत कांस्यपदकांची कमाई केली आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर करिअर करायचे आहे. तिच्याकडून आणखी भरपूर पदकांची व विजेतेपदांची अपेक्षा आहे.

सिंधूप्रमाणेच सायनाकडूनही अंतिम फेरीची अपेक्षा होती. मात्र उपांत्य फेरीत ओकुहारा हिच्याविरुद्ध तिने एक गेम जिंकूनही तिला सातत्य टिकविता आले नाही. ओकुहारा सायनापेक्षा खूपच तरुण आहे. त्यामुळे तीन गेम्सपर्यंत झालेल्या या लढतीत ओकुहाराची ताकद व क्षमता श्रेष्ठ ठरली. ओकुहाराने या स्पर्धेतील विजेतेपद मिळविताना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीन, माजी कांस्यपदक विजेती सायना व रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू यांच्यावर मात केली. तिचे हे यश अतुलनीय आहे. हे यश मिळविताना तिने दाखविलेला संयम, चतुरस्र खेळ, जिद्द गोष्टी आदी खूप महत्त्वाच्या आहेत. तिला अजूनही उज्ज्वल भवितव्य आहे. जागतिक स्तरावर आवश्यक असणाऱ्या तंदुरुस्तीबाबत सायनाच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. या खेळाच्या दृष्टीने ती आता प्रौढत्वाकडे चालली आहे.

भारतीय पुरुष खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे चमक दाखविता आली नाही. श्रीकांत, साईप्रणीत आदी खेळाडू अन्य विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये विशेषत: सुपर सीरिजमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवीत असतात. हे यश मिळविताना ते अनेक जागतिक किंवा ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंवर मात करीत असतात. तशी चमक त्यांनी जागतिक व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये दाखविली पाहिजे. सुपरसीरिजद्वारे त्यांना मिळणाऱ्या अनुभवाद्वारे त्यांनी जागतिक व ऑलिम्पिकमधील पदकांसाठी मानसिक कणखरपणा दाखविला पाहिजे.

दुहेरीत भारतात अलीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी महिलांच्या दुहेरीत अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. ज्वालाने स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती स्वीकारली असून तिने आता प्रशिक्षकाचा मार्ग स्वीकारला आहे. तिने एकेरीबरोबरच दुहेरीच्या लढतींवरही भर दिला पाहिजे. वैयक्तिक खेळांबरोबरच थॉमस व उबेर चषक स्पर्धामध्ये दुहेरीच्या लढतींना अनन्यसाधारण महत्त्व असते.

बॅडमिंटनमध्ये आता खूप सकारात्मक बदल झाला आहे. खेळाडूंना आता सदिच्छादूत होण्याची संधी मिळत आहे. आपल्या देशात भरपूर स्पर्धा होत असतात. तसेच भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्येही चांगल्या संधी मिळत आहेत. त्याचा उपयोग करीत करिअर समृद्ध करण्याबरोबरच देशाचा नावलौकिक कसा उंचावला जाईल यासाठी त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. पदुकोन, गोपीचंद, सायना व सिंधू यांनी निर्माण केलेला समृद्ध वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी युवा व उदयोन्मुख खेळाडूंवर आहे.
मिलिंद ढमढेरे : response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा