भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाची तयारी करण्यासाठी चेन्नईत दाखल झालेल्या धोनीने निवृत्तीची घोषणा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांनंतर मी निवृत्त झालोय असं समजावं. आपल्या कारकिर्दीत नेहमी खेळाचा विचार करणारा महेंद्रसिंह धोनी निवृत्तीची घोषणा करण्याआधी काय करत होता माहिती आहे??

निवृत्तीची घोषणा करण्याआधी धोनी नेट्समध्ये सराव करत होता. एम.ए.चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या खेळाडूंसाठी ट्रेनिंग कँपचं आयोजन करण्यात आलं आहे. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान चेन्नईचे खेळाडू इथे सराव करणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याआधी धोनीने रैनासह भरपूर सराव केला.

धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर संघातला त्याचा साथीदार सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही धोनी पुढील काही वर्ष आयपीएल खेळत राहणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे…असंही धोनीने CSK प्रशासनाला कळवलं आहे.

अवश्य वाचा – धोनीची निवृत्ती अचानक नाही, पत्र लिहून BCCI ला दिली होती कल्पना