खेळातील बारकावेच नव्हे तर यशाची चव कशी चाखायची आणि अपयशाला सामोरे कसे जायचे, या सगळ्या गोष्टी आम्ही सचिन तेंडुलकरकडून शिकलो, अशी कबुली कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिली.
‘‘प्रत्येक सामन्यासाठी सचिन कशी तयारी करतो, हे मी संघात सामील झाल्यापासूनच पाहत आलो. त्याचबरोबर आयुष्यात नम्रपणा किती महत्त्वाचा आहे तसेच यश आणि अपयश कसे पचवायचे, हेदेखील मी सचिनकडूनच शिकलो. सचिनने प्रत्येक वेळी संघातील खेळाडूंना वैयक्तिकपणे मदत केली आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली. पण त्याने ५० शतके आणि १०० अर्धशतके पूर्ण केली असती तर चांगले झाले असते. सचिनची उणीव आम्हाला प्रकर्षांने जाणवेल,’’ असे धोनी म्हणतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनसोबत फलंदाजी करताना त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्याचे धोनी मान्य करतो. ‘‘कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करायचे आणि पुढील चार-पाच षटकांत किती धावा पटकावण्याचे उद्दिष्ट ठेवायचे, यासारख्या अनेक गोष्टी मी सचिनकडून शिकत गेलो. सचिनचे भारतीय क्रिकेटसाठीचे योगदान मौल्यवान आहे. सचिनची  संघातील जागा न भरून काढण्यासारखी आहे,’’ असे धोनीने सांगितले.