थायलंडच्या मनीपाँग जाँगजितच्या जागी बदली खेळाडू घेण्याची सूचना आयबीएल व्यवस्थापनाने लखनौच्या अवध वॉरियर्स संघाला केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कॅनडा खुल्या स्पर्धेत कोर्टवर सहकारी खेळाडूशी वादविवाद केल्याप्रकरणी जागतिक बॅडमिंटन महासंघातर्फे जाँगजितची चौकशी सुरू आहे.
थायलंडचा दुहेरी विशेषज्ञ असलेला जाँगजित जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी आहे.
बोडिन इसारा या खेळाडूबरोबर वाद घालणे आणि गैरवर्तनप्रकरणी थायलंड बॅडमिंटन संघटनेने जाँगजितवर तीन महिन्यांची बंदी घातली आहे. या बंदीमुळे जाँगजितची इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) मध्ये खेळण्याची शक्यता धूसर झाली होती.
एकेरीच्या सामन्यादरम्यान, विश्रांतीच्या कालावधीत जाँगजितने आपली रॅकेट बोडिनच्या डोक्यावर मारली. या प्रकाराने चिडलेला बोडिन जाँगजितच्या अंगावर धावून गेला आणि त्याने जाँगजितवर हल्ला केला. आयबीएल गव्हर्निग काऊंसिलने दूरध्वनीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत या मुद्दय़ावर एकमताने निर्णय घेतला.
थायलंड बॅडमिंटन संघटनेच्या जाँगजितवर बंदीच्या निर्णयाचा आदर करण्याचे आयबीएल गव्हर्निग काऊंसिलने ठरवले. यामुळेच अवध वॉरियर्स या आयबीएलमधील जाँगजितच्या संघाला, त्याच्या जागी बदली खेळाडू घेण्याची सूचना करण्यात आली. पुढील ४८ तासांत, उपलब्ध निधीनुसार जाँगजितच्या जागी बदली खेळाडू घेण्याची अट अवध वॉरियर्ससमोर आहे.  
थायलंड बॅडमिंटन संघटनेने जाँगजितवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे, त्यांच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे प्रमुख डॉ. अखिलेश दासगुप्ता यांनी सांगितले.