भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना ३१ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात विजयाचे अंतर खूपच कमी होते. केवळ ३१ धावांच्या फरकाने भारत सरस ठरला. त्यामुळे भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी तळाच्या फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. ‘मालिकेतील शिल्लक राहिलेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांच्या कामगिरीत सुधारणा होणे हे महत्वाचे आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात अखेरचे पाच बळी केवळ २५ धावांत गमावले. त्यामुळे भारताचा डाव ३०७ धावांत संपुष्टात आला. पण मला तळाच्या फलंदाजांकडून आणखी २५ धावांचे योगदान अपेक्षित होते. फलंदाजीच्या विभागात आम्ही सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे नवव्या, दहाव्या व अकराव्या क्रमांकावरील फलंदाज आजच्या तुलनेत भविष्यामध्ये चांगली कामगिरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ऋषभ पंत फलंदाजीला आला, त्यावेळी संघाची धावसंख्या २६०च्या आसपास होती. यावेळी पंत याने संघावरील दडपण झुगारत झटपट ३०-३५ धावांची भर घातली. त्यानंतर आम्हाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, पण तळाच्या फलंदाजांनी निराशा केली आणि मोठी धावसंख्या गाठण्यात आम्हाला अपयश आले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.