युरोपीयन दौऱ्यावरील दुसऱ्या पराभवाला सामोरे जाण्यापूर्वी भारताने जबरदस्त संघर्ष केला. पण द हॅगू येथे झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने भारताला २-४ अशा फरकाने पराभूत केले.
मंगळवारी झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने प्रारंभापासून आक्रमक धोरण स्वीकारले. नवव्या मिनिटालाच मिर्को प्रुयसेरने पहिला गोल नोंदवला. भारतीय संघ या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच ग्लेन शूरमॅन (१५व्या) आणि ट्रिस्टॅन अल्जेरा यांनी आणखी दोन गोल झळकावले. त्यामुळे मध्यंतरालाच नेदरलँड्सने ३-० अशी आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने आत्मविश्वासाने टक्कर दिली. एस. के. उथप्पा (३७व्या) आणि कर्णधार सरदार सिंग (४०व्या) यांनी एकेक गोल करून भारताच्या आशा वाढवल्या. पण ६०व्या मिनिटाला नेदरलँड्सने पुन्हा डोके वर काढले आणि बिल्ली बेकरने शानदार गोलची नोंद केली.
द हॅगू येथे ३१ मे ते १५ जून या कालावधीत होणाऱ्या एफआयएच पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पध्रेच्या तयारीसाठी भारतीय संघ नेदरलँड्स दौऱ्यावर सराव सामने खेळत आहे. आग्स्टगीस्ट येथे झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने लीडेन हॉकी क्लबचा ७-० असा धुव्वा उडवला. मग एचजीसी हॉकी क्लबला ३-३ असे बरोबरीत रोखले. त्यानंतर बेल्जियमविरुद्धच्या लढतीत भारतीय संघ १-२ अशा फरकाने पराभूत झाला.