|| ऋषिकेश बामणे

भारताचे तीन स्पर्धक

सुमित नागल, रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे तीन भारतीय टेनिसपटू या स्पर्धेत खेळतील. पुरुष एकेरीत एकमेव नागलवर भारताची भिस्त असून कारकीर्दीतील तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत किमान तिसरी फेरी गाठण्याच्या निर्धाराने तो मैदानात उतरेल. पुरुष दुहेरीत बोपण्णा आणि शरण विदेशी सहकाऱ्यांसह खेळणार आहेत. महिला एकेरीत पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या अंकिता रैनाची नशिबावर मदार असून मुख्य फेरीतील एका प्रमुख खेळाडूने माघार घेतली, तरच अंकिताला संधी मिळू शकेल.

 

कसोटी क्रिकेटच्या खमंग मनोरंजनात मग्न झालेल्या भारतासह जगभरातील तमाम क्रीडाप्रेमींना या आठवड्यापासून टेनिसमधील ग्रँडस्लॅम स्पर्धेची रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे. चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला सोमवार, ८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. मात्र यंदाही सलग दोन वेळचा विजेता सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, स्पेनचा राफेल नदाल या अनुभवी शिलेदारांपैकीच एक जण सरशी साधणार की नव्या दमाचे तेजांकित त्यांच्यावर भारी पडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बोरिस बेकर, पीट सॅम्प्रस, स्टेफी ग्राफ यांपासून ते रॉजर फेडरर, राफेल नदाल यांसारख्या महान खेळाडूंचा वारसा लाभलेल्या या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना आता पुन्हा प्रारंभ झाला आहे. हार्ड कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील बादशाह म्हणून जोकोव्हिचला ओळखले जाते. ३४ वर्षीय जोकोव्हिचने या स्पर्धेत गेल्या वर्षी डॉमिनिक थीमला नमवून कारकीर्दीतील १७व्या ग्रँडस्लॅमवर मोहोर उमटवली. त्यामुळे यंदाही त्यालाच जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यातच रॉजर फेडररने या स्पर्धेतून माघार घेतल्याने जोकोव्हिचसमोरील आव्हान तुलनेने सोपे झाले आहे.

मात्र तिशीपल्याडच्या जोकोव्हिचला थीम, अलेक्झांडर झ्वेरेव्ह, डॅनिएल मेदवेदेव, स्टीफानोस त्सित्सिपास या युवा दमाच्या खेळाडूंकडून कडवी झुंज मिळू शकते. विशेषत: थीमने गतवर्षी अमेरिकन स्पर्धेचे जेतेपद मिळवल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. राफेल नदाल हा आणखी एक अनुभवी खेळाडू जोकोव्हिचच्या मार्गात अडथळा ठरू शकतो. नदालने सप्टेंबरमध्ये फ्रेंच स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घालून फेडररच्या १९ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी साधली. पुरुष एकेरीमधील त्रिमूर्तीचे वर्चस्व संपुष्टात आणून एखाद्या नव्या खेळाडूने यंदा जेतेपद मिळवल्यास टेनिसविश्वासाठीसुद्धा ती अभिमानास्पद बाब ठरेल.

महिला एकेरीत मात्र यंदाही नवी विजेती पाहायला मिळू शकते. मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला आहे, परंतु गेल्या वर्षभरापासून तिला सातत्याने जेतेपदाच्या जवळ येऊन पराभूत व्हावे लागत आहे. गतविजेती सोफिया केनिन, सिमोना हॅलेप, अ‍ॅश्ले बार्टी, बियांका आंद्रेस्कू यांसारख्या नामांकित खेळाडू या स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार असल्याने यंदा सेरेनाला अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

स्पर्धेत रंगणाऱ्या सामन्यांबरोबरच यंदा चर्चेचा विषय ठरत आहे, ते म्हणजे जैव-सुरक्षित वातावरण आणि विलगीकरणाचे नियम. एकीकडे देशातील वाढत्या करोना रुग्णांमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट दौरा रद्द केला. त्याशिवाय भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतसुद्धा यासंबंधी अनेकदा चर्चांना उधाण आले. त्यामुळे यंदा या स्पर्धेच्या आयोजकांपुढे खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन जपण्याचेही आव्हान आहे. खेळाडूंना या स्पर्धेदरम्यान प्रत्यक्षात सामन्यासाठी तीनच व्यवस्थापकांना घेऊन जाण्याची परवानगी असून यापैकी कोणालाही करोनाची लागण झाल्यास खेळाडूंना १४ दिवसांचे विलगीकरण अनिवार्य आहे. काही आठवड्यांपूर्वीच विमानाने प्रवास करताना काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने त्या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच कठोर विलगीकरणाला सामोरे जावे लागले. यामध्ये भारताचा दुहेरीतील टेनिसपटू रोहन बोपण्णाचाही समावेश होता. एकंदर या स्पर्धेच्या आयोजनाद्वारे वर्षभरातील टेनिस हंगामाला सुरुवात होत असल्याने यंदाची ऑस्ट्रेलियन स्पर्धा सर्वार्थाने पाहण्याजोगी ठरणार आहे.

rushikesh.bamne@expressindia.com