कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. एका क्षणाला भारतीय संघाला डावाने पराभव स्विकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी ही नामुष्की टाळली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ ९ धावांचं आव्हान दिलं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत न्यूझीलंडला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली आहे. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा शंभरावा विजय ठरला आहे.

वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघं ९ धावांचं आव्हान मिळालं. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ ३९ धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला.

यानंतर भारताचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ आलेली होती. मात्र अखेरच्या फळीत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत भारताचा लाजिरवाणा पराभव टाळला. मात्र न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर हे फलंदाजही फारवेळ तग धरु शकले नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आक्रमक क्षेत्ररक्षण लावत भारतीय फलंदाजांना धावा करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊदीने ५ तर ट्रेंट बोल्टने ४ बळी घेतले. याव्यतिरीक्त डी-ग्रँडहोमला एक बळी मिळाला.

Live Blog

05:39 (IST)24 Feb 2020
लॅथम आणि ब्लंडल यांनी विजयाची औपचारिकता केली पूर्ण

१० गडी राखत न्यूझीलंड पहिल्या सामन्यात विजयी

न्यूझीलंडची मालिकेत १-० ने आघाडी घेतली 

05:21 (IST)24 Feb 2020
टीम इंडियाचा अखेरचा फलंदाज माघारी, न्यूझीलंडला विजयासाठी ९ धावांचं आव्हान

टीम साऊदीने घेतला जसप्रीत बुमराहचा बळी

दुसऱ्या डावात भारताची १९१ धावांपर्यंतच मजल

05:17 (IST)24 Feb 2020
ऋषभ पंतही माघारी परतला, टीम इंडियाला नववा धक्का

साऊदीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर बोल्टने घेतला झेल

पंतची २५ धावांची खेळी

05:12 (IST)24 Feb 2020
भारताला आठवा धक्का, इशांत शर्मा माघारी

कॉलिन डी-ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर इशांत पायचीत

05:09 (IST)24 Feb 2020
पंत-इशांत शर्माने राखली भारताची लाज

दुसऱ्या डावात भारताला अखेरीस आघाडी, डावाने पराभव टाळला

04:37 (IST)24 Feb 2020
रविचंद्रन आश्विन माघारी परतला, भारताला सातवा धक्का

टीम साऊदीने घेतला आश्विनचा बळी, भारत सामन्यात अजुनही पिछाडीवर

04:16 (IST)24 Feb 2020
हनुमा विहारीही माघारी, भारतीय संघ अडचणीत

टीम साऊदीने उडवला विहारीचा त्रिफळा, भारतीय संघावर डावाने पराभवाचं सावट

04:15 (IST)24 Feb 2020
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताला पहिला धक्का

अजिंक्य रहाणे ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला

२९ धावांची खेळी करत रहाणे झेलबाद होऊन माघारी