आफ्रिका दौऱ्यात वन-डे सामन्यांमध्ये अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्माला अखेर पाचव्या सामन्यात सूर गवसला. आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करताना रोहितने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यानंतर रोहितच्या कामगिरीवर अनेक स्तरातून टीकादेखील झाली. पाचव्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने पत्रकारांना आपल्या फॉर्मवरुन विचारलेल्या प्रश्नाला खोचकपणे उत्तर दिलं.

“पहिल्या ३ सामन्यांमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ ३ सामन्यांमधल्या कामगिरीनंतर तुम्ही माझी कामगिरी कशी जोखू शकता?? एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर तुम्ही त्याला चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं म्हणता, आणि एखादा खेळाडू जर ३ सामन्यात अपयशी ठरला तर लगेच त्याच्यावर फॉर्मात नसल्याचा शिक्का लावता.” पाचव्या सामन्यातल्या शतकी खेळीसाठी रोहितचा सामनावीराचा किताब देऊन गौरव करण्यात आला.

अवश्य वाचा – रोहितचे एकाच हंगामात सर्वाधिक षटकार, पाचव्या सामन्यात तब्बल १० विक्रमांची नोंद

पहिल्या सामन्यांमध्ये मला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही ही गोष्ट मी मान्य करतो. मात्र प्रत्येक खेळाडूला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतचं. पण पाचव्या सामन्यासाठी मी सकारात्मक होतो, नेट्समध्ये सरावादरम्यानही मी चांगली फलंदाजी करत होतो. पण मी पुनरागमन करु शकेन यावर माझा विश्वास होता. रोहित पत्रकार परिषदेत आपल्या फॉर्मबद्दल बोलत होता. आतापर्यंत मी अनेक सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे दोन-तीन सामन्यांमधल्या खराब कामगिरीचा माझ्यावर परिणाम होणार नसल्याचंही रोहित म्हणाला.

मोठ्या कालावधीनंतर रोहितने वन-डे सामन्यात शतक झळकावलं असलं तरीही आपण सेलिब्रेशनच्या मुडमध्ये नसल्याचं रोहित म्हणाला. माझ्यासमोर दोन फलंदाज धावबाद होऊन माघारी परतले, सामन्यात तो प्रकार मला टाळता आला असता. त्यामुळे सध्या सेलिब्रेशन करण्याचा कोणताही विचार नसल्याचंही रोहितने स्पष्ट केलं. वन-डे मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर आता अखेरच्या सामन्यात भारत नेमकी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – वन-डे मालिकेत भारताचा विजय, आयसीसी क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान