चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षांकरिता बंदी घालण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी नवीन दोन फ्रँचाईजी घेण्याबाबत आयपीएलच्या संचालन समितीच्या रविवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. चेन्नई व राजस्थान यांच्या जागी नवीन दोन फ्रँचाईजींची निवड कोणत्या पद्धतीने करायची, लोढा समितीने चेन्नई व राजस्थान यांच्यावर घातलेल्या बंदीनंतर या संघांबाबत पुढील कारवाई कशी करावयाची याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. लोढा समितीच्या निर्णयानंतर शुक्ला यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आयपीएल स्पर्धेत आठ फ्रँचाईजींचा समावेश राहील, असे सांगितले होते. दोन संघांवर कारवाई केली असली तरी नवीन संघांसह ही स्पर्धा अतिशय यशस्वी होईल असेही त्यांनी सांगितले होते.
येथील बैठकीबाबत शुक्ला यांनी सांगितले, दोन फ्रँचाईजींकरिता नवीन निविदा काढायची किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच दोन संघ तयार करीत त्यांचे व्यवस्थापन करायचे या दोन पर्यायांबाबत उद्या चर्चा केली जाईल. तसेच लोढा समितीच्या अहवालाचे वाचन केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक उपसमिती नियुक्त केली जाईल.
दालमियांची अनुपस्थिती
आयपीएलच्या संचालक समितीच्या रविवारी होणाऱ्या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया हे आजारपणामुळे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘‘आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांनी नुकतीच दालमिया यांची भेट घेत चेन्नई व राजस्थान या संघांवरील कारवाईबाबत सविस्तर चर्चा केली आहे. मंडळाचे चिटणीस अनुराग ठाकूर हे या बैठकीस निमंत्रक म्हणून काम पाहणार आहेत.’’