Andre Russell Statement on KKR Win: आयपीएल २०२४ मधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीसह कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाच्या ट्रॉफीवरही आपले नाव कोरले. केकेआर तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी आणि ५७ चेंडू राखून मोठा पराभव केला. संपूर्ण आयपीएल हंगामात बॅट आणि बॉलने कहर निर्माण करणारा आंद्रे रसेल फायनल जिंकल्यानंतर मात्र खूप भावूक झाला आणि सर्व संघ जल्लोष करत असतानाच त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले. फायनलनंतर त्याने केकेआर फ्रँचायझीबद्दल मोठं वक्तव्यही केलं.

आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर आंद्रे रसेल खूपच भावुक झाला होता. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सीमारेषेवर उभा असलेला रसेल विजय मिळवताच दोन पाऊले जाऊन अचानक रडूच लागला. संघाच्या विजयानंतर त्याला बोलण्यासाठी शब्दही सुचेनात. केकेआरने सनरायझर्स हैदराबादला ११३ धावांत गुंडाळून एकतर्फी फायनलमध्ये आठ गडी राखून विजय मिळवून तिसरा ट्रॉफी जिंकला. रसेलसोबत हर्षित राणाही निशब्द झाला होता, फायनलमध्ये दोन विकेट घेणारा हर्षित राणा म्हणाला, ‘मी किती आनंदी आहे हे सांगता येणार नाही.’ अनुभवी रसेलही त्याच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि आनंद व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे शब्द नव्हते.

हेही वाचा – IPL 2024: विराट कोहलीपासून ते नवख्या नितीश रेड्डीपर्यंत हे खेळाडू ठरले मोठ्या पुरस्कारांचे मानकरी, एका क्लिकवर पाहा यादी

रसेल म्हणाला, “व्यक्त व्हायला शब्द नाहीत. हे जेतेपद खूप महत्त्वाचं आहे. मला आनंद आहे की आम्ही सर्वच जणांनी मिळून एका ध्येयासाठी काम केले. या फ्रेंचाइजीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. ही ट्रॉफी त्यांना आमच्या सर्वांकडून दिलेली एक भेट आहे.” आपल्या फिरकी गोलंदाजीने मोसम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने अभिषेक नायरच्या योगदानाचे कौतुक केले.

अंतिम सामन्यातील पहिल्या डावानंतर रसेलने मोठा खुलासा करत सांगितले की गेल्या काही वर्षांपासून मानसिक स्वास्थ्यामुळे तो ठीक नव्हता. ज्यामुळे मैदानावरील त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. याबद्दल सांगताना तो म्हणाला, “माझा फिटनेस हा त्यातला एक मोठा भाग आहे, पण मानसिकदृष्ट्या मी अधिक चांगल्या स्थितीत आहे. गेल्या काही वर्षांपासून मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो, खूप काही सहन करत होतो. पण आता मी ठीक आहे. मला आणखी काही वर्षे असंच खेळत राहायचं आहे,” रसेल म्हणाला.

हेही वाचा – KKR आणि शाहरूख खानने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘ही’ पोज देत केलं सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

३६ वर्षीय वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने या हंगामात १५ आयपीएल सामन्यांमध्ये १८५ च्या स्ट्राइक रेटने २२२ धावा केल्या आहेत आणि १९ विकेटही घेतले आहेत.