IPL 2024 Playoff Matches : आयपीएल २०२४ मधील आता प्लेऑफ्सचे सामने सुरू होणार आहेत. २१ मे रोजी आयपीएल २०२४ चा पहिला क्वालिफायर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात केकेआरला दुहेरी फायदा होणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार केकेआर हैदराबादविरुद्ध सामना न खेळताही अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे केकेआर अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. केकेआरसाठी फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण काय आहे? जाणून घेऊया.

केकेआर पॉइंट टेबलमध्ये अव्वल –

कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. केकेआर हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम नेट रन रेट असलेला संघ ठरला आहे. या हंगामात खेळल्या गेलेल्या एकूण १४ पैकी ९ सामने जिंकून २० गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद संघ १४ पैकी ८ सामने जिंकून १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमधील साखळी सामन्यातनंतर आता प्लेऑफ्सच्या सामन्यातही पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. या हंगामात आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. अशा परिस्थितीत पहिला क्वालिफायरही पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल याचा विचार केला आहे का?

केकेआर थेट फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

पहिला क्वालिफायर सामन्यात पावसाने अडथळा आणला, तर सर्व प्रथम पंच हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतील की सामना कसा तरी किमान ५ षटकांचा खेळवता येईल. मात्र, पाऊस खूपच वेळ सुरु राहिला आणि सामना उशिराने सुरु झाला, तर पंच ५ षटकांऐवजी १ षटकांची सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतील. जर पावसामुळे हेही साध्य नाही आणि सामना रद्द झाला, तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला केकेआर संघ सामना न खेळताच अंतिम फेरीत प्रवेश करेल.

हेही वाचा – IPL 2024 : कोलकाताने मुंबईचा विक्रम मोडत रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

केकेआरला दुहेरी फायदा –

कारण राखीव दिवस केवळ अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आला आहे. केकेआर आधीच फॉर्मात आहे. केकेआरच्या गोलंदाजांपासून फलंदाजांपर्यंत सर्वजण उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे केकेआर संघ आधीच ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. आता पाऊस पडला तरी केकेआरला फायदा होणार आहे. यावरून असे दिसते की, केकेआरला दुहेरी फायदा मिळणार आहे.

हेही वाचा – SRH vs PBKS : अभिषेक शर्माने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

आयपीएल २०२४ मधील ७० सामन्यांच्या लीग स्टेजनंतर प्लेऑफचे चित्रही स्पष्ट झाले आहे. दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने लीग टप्पा पहिल्या स्थानावर संपवला, तर सनरायझर्स हैदराबादने दुसरे, राजस्थान रॉयल्स तिसरे आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर राहिले. केकेआर आणि एसआरएच यांच्यातील पहिला क्वालिफायर मंगळवार, २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल, तर आआर आणि आरसीबी यांच्यातील एलिमिनेटर सामना त्याच मैदानावर बुधवारी, २२ मे रोजी खेळवला जाईल. पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत झालेल्या संघाचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी होईल.

हेही वाचा – IPL 2024 च्या प्लेऑफ्सचे चारही संघ ठरले! ‘क्वालिफायर वन’ आणि ‘एलिमिनेटर’ कोणत्या संघात होणार? जाणून घ्या

आयपीएल २०२४च्या प्लेऑफ वेळापत्रक:

क्वालिफायर-१: केकेआर विरुद्ध एसआरएच, २१ मे, अहमदाबाद
एलिमिनेटर: आरसीबी विरुद्ध आरआर, २२ मे, अहमदाबाद
क्वालिफायर -२: क्वालिफायर १ पराभूत वि एलिमिनेटर विजेता, २४ मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता ,२६ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,