IPL 2024, Chennai Super Kings vs Gujarat Titans: चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमधील सातवा सामना खेळवला जात आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात धोनीने पुन्हा एकदा जबरदस्त विकेटकीपिंग करत सगळ्यांनाच चकित केले. धोनीने पूर्णपणे हवेत झेप घेत एक शानदार कॅच टिपला. ४२ वर्षीय धोनीची या वयातही ही चपळता पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अवघ्या काही मिनिटातच धोनीने टिपलेल्या या झेलचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. धोनीने टिपलेल्या या झेलमुळे चेन्नईला तिसरी विकेट मिळवण्यात यश आले.

चेन्नईकडून ८वे षटक डॅरिल मिचेल टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजय शंकर स्ट्राईकवर होता. मिचेलने टाकलेला चेंडू शंकरच्या बॅटची कड घेऊन विकेटच्या मागे गेला. हे पाहताच धोनीने त्याच्या उजव्या बाजूला हवेत मोठी झेप घेत एक भन्नाट कॅच घेतला. धोनीचा हा अफलातून झेल टिपताच चेपॉकमधील चाहता वर्गाने एकच जल्लोष सुरू केला. धोनीच्या या झेलचा व्हीडिओ सोशल मिडियावर वणव्यासारखा पसरला आहे.

तत्त्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २०६ धावांचा डोंगर उभारला. शिवम दुबेने २१ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळी करत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. चेन्नईने दिलेल्या २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला नाकीनऊ आले आहेत. गुजरातचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. १०० धावांचा टप्पा ओलांडण्यापूर्वी टायटन्सची सुरूवातीची फलंदाजी फळी पॅव्हेलियनमध्ये परतली.