कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमकडून खेळणाऱ्या शुभमन गिलने आज आपल्या सुंदर खेळाचे प्रदर्शन करत आपल्या टीमकडे विजय खेचून आणला. इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता आणि चेन्नई या दोन संघांची मॅच सुरु होती. आयपीएलच्या या सामन्यात टॉस जिंकून कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता टीम समोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले.

१७८ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता टीमने चांगली सुरुवात केली. मात्र ख्रिस लिन १२ धावांवर, सुनील नरिने ३२ धावांवर आणि रॉबिन उथप्पा ६ धावांवर बाद झाले. त्यानंतर मैदानावर आला तो शुभमन गिल. त्याला रिंकू सिंगने साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र हरभजनने रिंकू सिंगचीही विकेट काढली. रिंकू १६ धावांवर बाद झाला तेव्हा कोलकाता संघाची अवस्था ९७ धावांवर ४ गडी बाद अशी झाली होती. यानंतर कसोटी लागली ती शुभमन गिलची. शुभम सुरुवातीला काहीसा तणावाखाली खेळला. मात्र सेट झाल्यावर त्याने ३६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावले आणि नाबाद ५७ धावांची खेळी करत कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. त्याची ही खेळी कोलकाता टीमच्या विजयासाठी निर्णायक ठरली.

शेन वॉटसनच्या तीन चेंडूंवर शुभमन गिलने तीन चौकार हाणले. शुभमनला तेवढीच चांगली साथ दिली ती दिनेश कार्तिकने. शुभमन गिलने जे दोन षटकार लगावले ते देखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो शुभमन गिलच. कोलकाता टीमकडून खेळताना शुभमन गिलने आपल्या आयपीएल करिअरमधले पहिले अर्धशतक ३२ चेंडूंमध्ये झळकावले. शुभमन आणि दिनेश कार्तिक यांनी केलेली ८३ धावांची भागिदारी कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचा पाया रचणारी ठरली.