Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 36 runs and enter the final : आयपीएल २०२४ मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव करत ६ वर्षांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. आता २६ मे रोजी ते कोलकाता आणि हैदराबाद विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने असतील. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम खेळताना हेनरिक क्लासेनने अर्धशतकाच्या जोरावर १७५ धावा करत सन्मानजनक धावसंख्या उभारली. यानंतर हैदराबादने शाहबाज अहमदच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला १३९ धावांवर रोखत विजयावर शिक्कामोर्तब केला.

राजस्थान रॉयल्स संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल व्यतिरिक्त संघाची संपूर्ण फलंदाजी झुंजताना दिसली. जैस्वालने २१ चेंडूत ४२ धावा केल्या आणि या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याबरोबर ध्रुव जुरेलने ३५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. विशेषत: शाहबाज अहमदने मधल्या षटकांमध्ये ३ महत्त्वाचे बळी घेत सामन्याची दिशाच बदलून टाकली. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएल २०२४ हंगामाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे.

शाहबाजने तीन विकेट घेतल्याने राजस्थानचा डाव फसला –

क्वालिफायर-१ सामन्यात केकेआरनने हैदराबादचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानने एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करून अंतिम फेरी गाठण्याचा पहिला अडथळा पार केला होता, परंतु विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी संघाला शेवटचा अडथळा पार करता आला नाही आणि त्याचा प्रवास येथेच संपला.राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हैदराबादने खराब सुरुवातीनंतर सावरत आणि हेनरिक क्लासेनच्या ३४ चेंडूत ५० धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ९ गडी गमावून १७५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – SRH vs RR : ट्रेंटने हैदराबादच्या फलंदाजीचे नट-‘बोल्ट’ ढिल्ले करत रचला विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज

प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली, मात्र तो बाद झाल्यानंतर संघाची लय विस्कळीत झाली. ध्रुव जुरेलने अर्धशतक झळकावून संघाला सामन्यात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी आवश्यक धावगती इतकी जास्त होती की जुरेलचे प्रयत्नही कामी येऊ शकले नाहीत. राजस्थानने २० षटकांत सात गडी गमावून १३९ धावा केल्या. हैदराबादसाठी प्रभावी खेळाडू म्हणून आलेला फिरकीपटू शाहबाज अहमदने उत्कृष्ट गोलंदाजी केली. शाहबाजने तीन विकेट घेतल्याने राजस्थानचा डाव फसला.

हेही वाचा – ‘जर मी त्याच्या जागी असते तर हार मानली असती’, पत्नी दीपिकाची कार्तिकबद्दल प्रतिक्रिया, विराट काय म्हणाला?

अभिषेकची बॅटने नव्हे तर चेंडूने चमकदार कामगिरी –

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माने ५ चेंडूत १२ धावा केल्या आणि हैदराबादच्या डावाच्या पहिल्याच षटकात तो बाद झाला. पण राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने एक-दोन नव्हे तर चार षटके टाकली. अभिषेकने ४ षटकात अवघ्या २४ धावा देत दोन महत्त्वाचे बळी घेतले. प्रथम त्याने संजू सॅमसनला १० धावांवर एडन मार्करमकडे झेलबाद केले आणि त्यानंतर अवघ्या ४ धावांवर शिमरॉन हेटमायरला बोल्ड केले.