Shahrukh Khan KKR vs SRH Qualifier 1 IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. केकेआर संघ आयपीएलच्या इतिासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. क्वालिफायर सामना पाहण्यासाठी संघाचा मालक शाहरुख खान देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर उपस्थित होता. शाहरुख आपली मुलगी आणि मुलासोबत सामना पाहण्यासाठी आला होता. केकेआरच्या विजयानंतर शाहरुखने अहमदाबादच्या स्टेडियममधील मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले. पण या दरम्यानचा शाहरूखचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

चाहत्यांचे आभार मानत असतानाच शाहरुखकडून एक चूक झाली. मैदानावर फेरी मारत असताना शाहरुख खान समालोचकांच्या कार्यक्रमाच्या मध्ये जाऊन पोहोचला. चाहत्यांना हात दाखवत असतानाच त्याला कळलंच नाही की आपण कधी लाइव्ह कार्यक्रमाच्या मध्ये पोहोचलो आहोत. शाहरुखला आपली चूक लक्षात येताच त्याने तात्काळ समालोचक आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल यांची माफी मागितली आणि त्यानंतर त्यांनी किंग खानला मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा – IPL 2024: “माझी आई अजूनही रुग्णालयात…”, KKR चा खेळाडू आई आजारी असतानाही सामना खेळण्यासाठी का आला? स्वत सांगितले कारण

तर शाहरूखच्या पुढे असलेले सुहाना आणि अब्राहमसुध्दा लाइव्ह कार्यक्रमात जाता जाता मागे फिरले आणि त्यांनीही माफि मागितली. पण शाहरूखने जाताना देखील हात जोडून त्याच्याकडून अनावधानने झालेल्या चुकीची माफी मागितली, ज्यामुळे सर्वांचं मन जिंकलं आहे. आकाश चोप्रा, सुरेश रैनाही शाहरूखचे कौतुक करताना दिसले. समालोचकांच्या माईकवरून शाहरूख माफी मागत असल्याचेही ऐकू येत होते.

केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. केकेआरने जेतेपद पटकावले तेव्हा गौतम गंभीर संघाचा कर्णधार होता. यावेळी संघात गंभीर मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआर संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यात केकेआर यशस्वी होणार का हे पाहायचे आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांना केवळ १५९ धावा करता आल्या.

केकेआरचा अनुभवी गोलंदाज स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी करत ३ विकेट घेत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर केकेआरच्या इतर गोलंदाजांनीही कमाल कामगिरी करत हैदराबादवर आपली पकड मजबूत ठेवली. तर केकेआरने २ विकेट गमावून सहज लक्ष्य गाठले. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत ५१ धावा केल्या तर कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत ५८ धावांची खेळी करत केकेआरला अंतिम फेरीत नेले.