KKR vs SRH Qualifier 1 Highlights: कोलकाता नाइट रायडर्सने मंगळवारी आयपीएल २०२४च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून सामना जिंकला. केकेआरसाठी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. आता दरम्यान, KKR चा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने आई आजारी असतानाही तो कोलकाता कॅम्पमध्ये का सामील झाला, याचा खुलासा केला आहे.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी चमकदार कामगिरी करणारा इंग्लिश खेळाडू फिल सॉल्ट याला राष्ट्रीय कर्तव्यासाठी आयपीएलच्या मध्यावर आपल्या देशात परतावे लागले. यामुळे प्लेऑफपूर्वी त्याच्या बदलीबाबत केकेआरच्या खेम्यात बरीच चिंता होती. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाजचा पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. फिल सॉल्ट सलामीला उतरत असल्याने संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या मोसमात केकेआरसाठी दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्या सॉल्टची जागा तो घेऊ शकणार का, हा प्रश्न होता. परंतु गुरबाजने या संधीचे सोने करत संघाला चांगली सुरूवात करून दिली.

हेही वाचा- USA vs BAN: अमेरिकेने दिली आगमनाची नांदी; बांगलादेशवर साकारला शानदार विजय

आई हॉस्पिटलमध्ये असतानाही गुरबाज आयपीएलसाठी भारतात का परतला?


रहमानउल्ला गुरबाजची आई हॉस्पिटलमध्ये भरती आहे. पण आईची तब्येत ठीक नसताना संघाला आपली गरज असल्याचे कळताच तो भारतात परतला आणि केकेआरकडून चांगली कामगिरीही केली. हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने महत्त्वाची माहिती देताना सांगितले की. “माझी आई अजूनही रुग्णालयात आहे, मी तिच्याशी रोज बोलतो. पण फिल सॉल्ट गेल्यानंतर केकेआर संघाला माझी इथे गरज आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मी अफगाणिस्तानातून परत आलो आणि इथे येऊन मला खूप चांगलं वाटतंय. माझी आई देखील माझ्यासाठी आनंदी आहे.”

हैदराबादने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुरबाजने भुवनेश्वर कुमारविरुद्ध चौकार मारून सुरुवात केली. दुसऱ्या षटकात, त्याने हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार मारून खेळलेल्या डॉट बॉलची भरपाई केली. त्याने भुवनेश्वरच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार मारला. चौथ्या षटकात मात्र गुरबाज बाद झाला. वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या चेंडूवर गुरबाज झेलबाद होत माघारी परतला. अफगाणिस्तानच्या या खेळाडूने सलामीवीर म्हणून १४ चेंडूत २३ धावा केल्या आणि केकेआरला नारायणच्या साथीने धमाकेदार सुरुवात करून दिली. रहमानउल्ला गुरबाजने मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या मोसमात त्याने १३३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ११ सामन्यात २२७ धावा केल्या होत्या.