रणजी हंगामात सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड झालेल्या स्टुअर्ट बिन्नीने कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना शेष भारताविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी साकारली. न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाल्याने बिन्नीला कर्नाटकसाठी महाराष्ट्रविरुद्धच्या अंतिम लढतीत खेळता आले नव्हते. मात्र न्यूझीलंडहून परतताच बिन्नीने कर्नाटक संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली.
१ बाद ३५ वरून पुढे खेळणाऱ्या कर्नाटकला पहिला धक्का लोकेश राहुलच्या बाद होण्याने बसला. राहुलला अनुरित सिंगने ३५ धावांवर बाद केले. यानंतर मनीष पांडे आणि सतीश जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेला मनीष पांडेला पंकज सिंगने बाद केले. सतीशने करुण नायरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. अनुभवी हरभजन सिंगने सतीशला बाद करत ही जोडी फोडली. सतीशने ११ चौकारांसह ८४ धावांची खेळी केली. सतीश बाद झाल्यानंतर करुण आणि बिन्नी जोडीने पाचव्या विकेटसाठी ६.४१च्या सरासरीने १८७ धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारत कर्नाटकला दमदार आघाडी मिळवून दिली. पंकज सिंगच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत बिन्नीने आपले शतक पूर्ण केले. शतकाकडे कूच करणाऱ्या करुण नायरला पंकज सिंगने त्रिफळाचीत केले. १२ चौकारांच्या साह्य़ाने त्याने ही खेळी साकारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टुअर्ट बिन्नी ११५ तर चिदम्बरम गौतम ६ धावांवर खेळत आहेत. बिन्नीने १४ चौकार आणि ३ षटकारांच्या आधारे ही खेळी केली. कर्नाटककडे १८९ धावांची आघाडी आहे.