महाराष्ट्राने पुरुष व महिला या दोन्ही गटांत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि बारामतीमध्ये सुरू असलेल्या पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेत आपली आगेकूच सुरू ठेवली. पुरुष गटात राजस्थान, दिल्ली व मध्य प्रदेश यांनी तर महिलांमध्ये विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगढ यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
 या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सकाळच्या सत्रात बीएसएनएल संघावर ४१-९ अशी मात केली. पूर्वार्धात त्यांनी २९-८ अशी भक्कम आघाडी घेतली होती. दुपारच्या सत्रात महाराष्ट्राने मध्य प्रदेशचा ३७-१० असा पराभव केला. या दोन्ही सामन्यांमध्ये महाराष्ट्राकडून काशिलिंग अडकेने अष्टपैलू खेळ केला. नितीन मदने व भूषण कुलकर्णी यांनी खोलवर चढाया केल्या तर पकडींमध्ये विशाल माने हा चमकला.
पुरुष गटातच राजस्थानने विदर्भ संघावर ३५-२० अशी मात केली. पूर्वार्धात त्यांनी २३-१२ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून वजीर सिंग व नवनीत सिंग यांची कामगिरी उल्लेखनीय होती. विदर्भच्या श्रीकांत जाधव व दादा आव्हाड यांची लढत निष्फळ ठरली. पूर्वार्धात ३३-१४ अशी आघाडी घेणाऱ्या गुजरातने गोव्यावर ६०-२८ असा सहज विजय मिळविला. त्याचे श्रेय किरण परमार व नरेंद्र सिंग यांच्या खेळास द्यावे लागेल. मध्य प्रदेशने सकाळी छत्तीसगढचा ५२-१० असा दणदणीत पराभव केला, त्यामध्ये मुकेश पवार व महेश गौड यांनी केलेल्या चौफेर चढायांचा मोठा वाटा होता.
महिलांमध्ये सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने राजस्थानवर ६५-२० असा सफाईदार विजय मिळविला. पूर्वार्धात ३८-११ अशी महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राने विदर्भचा ५६-८ असा सपशेल धुव्वा उडविला. पूर्वार्धात महाराष्ट्राने तीन लोण नोंदवित ३३-६ अशी आघाडी मिळविली होती. महाराष्ट्राच्या या विजयांमध्ये अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ यांच्या चौफेर चढाया, पूजा शेलारने केलेल्या पकडींचा महत्त्वाचा वाटा होता.
अन्य लढतीत गुजरातने गोव्याचा ३७-९ असा पराभव केला. विजयी संघाकडून पूजा शर्मा, सुनीता गामीत यांचा खेळ कौतुकास्पद होता. गोव्याकडून शिल्पा राणे व सुप्रिया गवस यांची लढत संघाचा पराभव टाळू शकली नाही. उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत मध्य प्रदेशने छत्तीसगढवर ३३-३० असा रोमहर्षक विजय नोंदविला. पूर्वार्धात मध्य प्रदेश १४-१९ असा पिछाडीवर होता. उत्तरार्धात नीतू सिंग व जयलक्ष्मी स्वामी यांनी केलेल्या वेगवान खेळामुळेच मध्य प्रदेशने विजयश्री खेचून आणली.