ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशला अखेर केरळ सरकारने मोठं बक्षीस देण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंवर त्यांच्या राज्यातील सरकारांनी बक्षिसांचा वर्षाव केला असतानाच दुसरीकडे केरळ सरकारने कोणतेही बक्षिस जाहीर न केल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच केरळ सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या हातमाग विभागाने तर श्रीजेशचा सत्कार करण्यासाठी धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये असं बक्षिस देण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. एवढ्या मोठ्या स्तरावर पदक मिळवूनही असा सत्कार करणार का असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. अखेर केरळ सरकारने चाहत्यांच्या मागणीची दखल घेत श्रीजेशबरोबरच राज्यामधून ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी बक्षिसांची घोषणा केलीय.

नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?

भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये संपवत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. भारतीय हॉकी संघाच्या या विजयामध्ये गोलपोस्टवर एखाद्या भिंतीप्रमाणे उभा राहून विरोधी संघाची आक्रमणे परतवून लावणारा गोलकीपर पी. आर. श्रीजेशचं त्याच्या कामगिरीसाठी सर्वच स्तरामधून कौतुक झालं. अनेकांनी तर सोशल नेटवर्किंगवर श्रीजेशला ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणत त्याचं कौतुक केलं. परात्तू रविंद्रन श्रीजेशचा जन्म केरळमधील एर्नाकुलममधील किझाककामबल्लम या गावी झाला असून वयाच्या १२ व्या वर्षी त्याने जीव्ही राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये जाण्यास सुरुवात केली. हॉकीमध्ये करियर करण्याचं त्याने निश्चित केलं नव्हतं. मात्र त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला तू गोलकिपर म्हणून छान कामगिरी करशील असं सांगितलं. २०२१ साली त्याच्या गोलकिपींगच्या कौशल्यामुळेच ऑलिम्पिक हॉकी संघात संधी मिळाली ज्याचं त्याने सोनं करुन दाखवलं. अत्यंत मोक्याच्या क्षणी श्रीजेशने विरोधकांना गोल करण्यापासून रोखल्याने भारत विजयी ठरला. श्रीजेशवर कौतुकाचा वर्षाव होताना त्याच्या राज्याने मात्र त्याला बक्षिस जाहीर न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. अखेर राज्य सरकारने श्रीजेशला मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.

केरळ सरकारने श्रीजेशला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच श्रीजेशला बढती देण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय. श्रीजेश सध्या सार्वजनिक शिक्षण विभागामध्ये उपनिर्देशक म्हणून कार्यरत होता. आता त्याला बढती देऊन सहाय्यक निर्देशक करण्यात येणार आहे.

केवळ श्रीजेशच नाही तर केरळ सरकारच्या मंत्रीमंडळाने राज्यामधून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील सर्वच्या सर्व आठ खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

श्रीजेशच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी केरळमधील हातमाग विभागाने शनिवारी एका विशेष पुरस्कारी घोषणा केल्यानंतर त्याची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा दिसून आली होती. मल्याळम भाषेतील जन्मभूमी या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार केरळ हातमाग विभाग श्रीजेशचा सत्कार म्हणून त्याला धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये देऊन गौरवणार आहे.

नक्की वाचा >> २४ वर्षीय ऑलिम्पिक सायकलपटूचा आकस्मिक मृत्यू; तिची शेवटची Instagram पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

 

View this post on Instagram

 

A post shared by The Tatva (@thetatvaindia)

एकीकडे खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बक्षीसांचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे श्रीजेशचा अशा साध्या पद्धतीने सत्कार होणार असल्याने हा सत्कार चर्चेत आहे. श्रीजेशला देण्यात येणारा हा पुरस्कार फारच वेगळा असून यावरुन केरळ सरकारला ट्रोल केलं जात आहे. एकाने पाच किलो तांदूळच दिले असते असा टोला लगावला आहे तर एकाने या मोबदल्यात ते पैसे मागणार नाही अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.

नक्की पाहा >> “फेकण्याची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळालीय”; Viral झाला मोदींच्या आवाजातील श्याम रंगीलाचा व्हिडीओ

नक्की पाहा >> Viral Video : नीरज चोप्रा नाही तर ‘या व्यक्तीने मिळवून दिलंय भालाफेकमध्ये पहिलं मेडल’

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी श्रीजेशसाठी कोणत्याही विशेष पुरस्कारीच घोषणा केलेली नाही अशी टीका या बातमीनंतर केली जात होती. श्रीजेशसोबत हॉकी संघात खेळणाऱ्या पंजाब आणि हरयाणातील खेळाडूंना त्यांच्या राज्यांनी मोठी रक्कम बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केल्याचंही बोललं गेलं. अखेर बुधवारी केरळ सरकारने श्रीजेशला दोन कोटींचं बक्षिस जाहीर केलं.