रत्नागिरी रायडर्स संघाने रविवारी महाकबड्डी लीगच्या महिला गटामध्ये पुणे पँथर्स संघावर ३२-२९ असा निसटता विजय मिळवत ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवले आणि पुणे पँथर्सचे आव्हान संपुष्टात आणले. तर पुरुषांमध्ये ठाणे टायगर्सने रायगड डायनामोजला अटीतटीच्या सामन्यात ४४-३७ असे हरवून स्पध्रेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. ठाण्याने सहा गुणांसह आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले आहे.
 खेड (जि. रत्नागिरी) महाड नाका येथील गोळीबार मदानावर झालेल्या महाकबड्डी लीग स्पध्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी महिलांमध्ये रत्नागिरीने सामन्याच्या सातव्या मिनिटालाच पुण्यावर लोन चढवून आपली आघाडी वाढविली. रत्नागिरीच्या अपेक्षा टाकळेने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला २० गुण मिळवून देत विजयात मोलाचा वाट उचलला. यामध्ये तिने १३ गुणांसह ७ बोनस गुण मिळवले. तिला संघनायक ललिता घरत व ईश्वरी कोंढाळकरने प्रत्येकी ४ पकडी घेऊन मोलाची साथ दिली. रेखा सावंतने ३ गुण घेऊन विजयाला हातभार लावला.
पुण्याचा संघ सुरुवातीपासून पिछाडीवर राहिला, मात्र संघनायक पूजा केणीने या सामन्यात अत्यंत महत्त्वाच्या वेळी ११ गुण मिळवून संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पुण्याने १४व्या मिनिटाला रत्नागिरीवर लोण चढवला आणि मध्यंतरापूर्वी १८-१८ अशी बरोबरी साधत आपली पिछाडी भरून काढत सामन्यातील रंगत वाढवली. मध्यंतरानंतर हा सामना अत्यंत दोलायमान स्थितीत होता. मात्र शेवटच्या मिनिटाला अपेक्षा टाकळेने गुण मिळवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पुण्याच्या शिवनेरी चिंचवले व मीनल जाधवने प्रत्येकी ४ गुण व श्रद्धा पवारने ३ गुण मिळवून आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले.
पुरुषांमध्ये ठाण्याच्या सूरज देसाईने एकहाती विजय मिळवून दिला. मध्यंतराला २०-२० अशी बरोबरी होती. सूरजने चढायांमध्ये २९ गुण (२ बोनस) मिळवले व एक पकड केली. त्याला नीलेश साळुंकेने ५ गुण मिळवून साथ दिली. रायगडच्या आरिफ सय्यदने संपूर्ण सामन्यात ६ पकडी केल्या आणि चढायांमध्ये ५ गुण (१ बोनस) संपादन केले. रोहन गमरेने चढायांच्या ९ गुणांसह २ पकडी केल्या.