वाशिम येथे पार पडलेल्या १५ व्या सबज्युनिअर व २६ व्या ज्युनिअर राष्ट्रीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात झाल्या. या रस्सीखेच अजिंक्यपद स्पध्रेत महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय स्तरावर बुलढाणा जिल्ह्य़ाचा झेंडा रोवून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघासह इतर १८ राज्याचे संघ सहभागी झाले होते. विजयी संघाचे रविवारी चिखली शहरात आगमन होताच ढोलताशांच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले.
या रस्सीखेच स्पध्रेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या महाराष्ट्र संघातील खेळाडूंमध्ये बुलढाण्यातील अक्षय जाधव व विशाल सपकाळ यांचा ५४० वजन गटात समावेश होता. ५०० वजन गटातही महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळाले असून यात दिग्विजय वाघ याने पदक पटकावले, तसेच ४४० वजन गटात राज्याच्या संघाने कास्यपदक प्राप्त केले. या गटात सहभागी झालेल्या खेळाडूत पुष्कराज श्रीकिसन परिहार, शेख दानिश, संकेत घडेकर यांचा समावेश होता. आपल्या विजयाचे श्रेय सर्व खेळाडू टग ऑफ वॉरचे जिल्हाध्यक्ष शेषनारायण लोढे, सचिव ज्योती श्रीराम निळे, कोषाध्यक्ष योगेश शर्मा, बाळकृष्ण जाधव व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे यांना दिले. या राष्ट्रीय स्पध्रेकरिता पंच म्हणून जिल्ह्य़ातील दिलीप यंगड, हर्षवर्धन देशमुख, आशिष देशमुख यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी अनिल चांदूरकर व महानकर यांची विशेष उपस्थिती होती.