महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये मुंबई शहर पोलीस दलातील लखन म्हात्रे आणि कोल्हापूर परिक्षेत्रातील दिलीप पाटील यांनी कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाणे पोलीस दलातील तनाजी गाडे, कोल्हापूर परिक्षेत्रातील जयश्री बोर्गे, किरण जाधव आणि कोकण परिक्षेत्रातील रुपाली पाटील यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. या स्पर्धेवर आतापर्यंत कोल्हापूर परिक्षेत्राचा वरचष्मा असल्याचे चित्र आहे.
या स्पर्धेसाठी अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, नागपूर, नांदेड, नाशिक, रेल्वे, राज्य राखीव पोलीस दल या परिक्षेत्रासह मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर शहर आणि प्रशिक्षण संचालक असे १४ चमू ठाण्यात दाखल झाले आहेत. कुस्ती स्पर्धा ५५ आणि ६० किलो अशा दोन वजनी गटात घेण्यात आल्या. यामध्ये ५५ किलो वजनी गटात लखन म्हात्रे (मुंबई शहर) यांनी सुवर्ण, दीपक जाधव (मुंबई शहर) यांनी रौप्य पदक पटकाविले तर राज्य राखीव पोलीस दलातील एल.डी. माळी आणि संदीप सोनावणे यांनी कास्य पदक पटकाविले. ६० किलो वजनी गटात दिलीप पाटील (कोल्हापूर परिक्षेत्र) यांना सुवर्ण, युवराज पाटील (मुंबई शहर) यांना रौप्य पदक मिळाले आहे. तर राज्य राखीव पोलीस दलातील के.डी. कुडले आणि यु. एन. सुळ यांना कास्य पदक मिळाले आहे.  अ‍ॅथलेटिक्समध्ये पाच हजार मीटर धावणे स्पर्धेत पुरूष गटात तानाजी गाडे (ठाणे शहर) यांना सुवर्ण, विनोद चव्हाण (नागपूर परिक्षेत्र) यांना रौप्य, शत्रुघ्न धाराव (राज्य राखीव पोलीस बल) यांना कास्य पदक मिळाले आहे. महिला गटामध्ये जयश्री बोर्गे (कोल्हापूर परिक्षेत्र) यांना सुवर्ण, सीमा अख्तर (नागपूर परिक्षेत्र) यांना रौप्य आणि मीना देसाई (कोल्हापूर परिक्षेत्र) यांना कास्य पदक मिळाले आहे.